दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेचे तीव्र पडसाद जगभरात उमटत असतानाच राजधानीत विनयभंगाची एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. संरक्षण मंत्रालय आणि महसूल संचालनालयाच्या कर्मचाऱ्यांनी एका महिलेचा विनयभंग करून तिला गाडीतून पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी घडली. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. रविवारी संरक्षण मंत्रालयातील कर्मचारी आणि महसूल संचालनालयात काम करणाऱ्या एका पोलीस हवालदारासह पाच जणांनी एका विवाहितेवर बलात्काराचा प्रयत्न केल्याचा प्रकार उत्तर पश्चिम दिल्लीतील बावना नगर भागात घडला. तक्रारदार महिला आपल्या सुनेसह बावना भागातील झोपडीत रविवारी जेवण बनवत होती. त्यावेळी पाच व्यक्ती त्यांच्या झोपडपट्टीत शिरल्या आणि त्यांनी सुनेचा विनयभंग करून तिला गाडीतून पळवण्याचा प्रयत्न केला. मात्र तक्रारदार महिलेने विरोध करून आरडाओरडा केल्यामुळे आजूबाजूच्या लोकांनी धाव घेऊन पाचही आरोपींना पकडून पोलिसांच्या हवाली केले.