या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारत शांततेसाठी कटिबद्ध असला तरी राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणारे कोणत्याही प्रकारचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी देशाची सशस्त्र दले सुनियोजित पद्धतीने पुरेशी सुसज्ज आहेत, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी चीनने लडाखमध्ये गेल्या वर्षी घेतलेल्या विस्तारवादी भूमिकेच्या अनुषंगाने सोमवारी येथे स्पष्ट केले.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येवर देशाला संबोधित करताना कोविंद यांनी शेतकऱ्यांचे आंदोलन, कोविड-१९शी लढण्यासाठी देशाने केलेले प्रयत्न, आत्मनिर्भर भारत आदी मुद्दय़ांनाही स्पर्श केला.

कोणत्याही परिस्थितीत देशाच्या हिताचे रक्षण केले जाईल, असे स्पष्ट करतानाच कोविंद यांनी, तीन कृषी कायद्यांबाबत शेतकऱ्यांच्या मनात असलेली भीती दूर करण्याचा प्रयत्न केला. सुधारणांच्या मार्गावर सुरुवातीला गैरसमज होतील; परंतु सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी बांधील आहे, असेही राष्ट्रपती म्हणाले.

देशातील जनतेने बंधुत्वाच्या घटनात्मक मूल्यांची जोपासना केली, त्याविना कोविड-१९ शी परिणामकारक लढा देणे शक्य नव्हते. जगभर फैलाव झालेल्या करोनाचा मुकाबला करण्यासाठी भारताने अनेक देशांना औषधांचा पुरवठा केला आणि त्यामुळे भारत जगभराचे औषधालय बनला याचाही कोविंद यांनी अभिमानाने उल्लेख केला.

गेल्या जून महिन्यात पूर्व लडाखमध्ये चीनच्या सैन्याबरोबर झालेल्या चकमकीत भारताचे २० जवान शहीद झाले, त्यांना आदरांजली वाहताना कोविंद म्हणाले की, सरलेले वर्ष अनेक आघाडय़ांवर प्रतिकूल होते. सीमेवर विस्तारवादी भूमिकेचा सामना करावा लागला, परंतु आपल्या शूर जवानांनी तो हाणून पाडला. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी २० जवान शहीद झाले.

भारत शांततेसाठी कटिबद्ध असला तरी लष्कर, हवाई दल आणि नौदल ही सशस्त्र दले देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणारे कोणतेही प्रयत्न हाणून पाडण्यास सुसज्ज आहेत. कोणत्याही स्थितीत देशाच्या हिताचे रक्षण केले जाईल. प्रतिकूल स्थिती नेहमीच शिक्षकाची भूमिका वठवते आणि जनतेला अधिक सामथ्र्यवान आणि अधिक सक्षम बनवते, असेही ते म्हणाले.

त्यांनी सांगितले की, देशात आर्थिक सुधारणा वेगाने होत असून जगात भारताने योग्य स्थान मिळविले आहे. गेल्या काही वर्षांत भारताचा जगाच्या अनेक भागांवर प्रभाव पडला आहे. भारताचा संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषदेत अस्थायी सदस्य म्हणून प्रवेश झाला आणि त्यासाठी भारताला ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय समुदायाकडून पाठिंबा मिळाला ते भारताचा प्रभाव वाढत चालला असल्याचे द्योतक आहे. भारताने एक जबाबदार आणि विश्वासार्ह देश म्हणून लौकिक मिळविला आहे. शेतकऱ्यांनी देशाला अन्नधान्याच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण बनविले. मेहनती शेतकऱ्यांनी देशाच्या अन्नसुरक्षेची काळजी घेतली त्याचप्रमाणे सशस्त्र दलांच्या आपल्या शूर जवानांनी देशाच्या सीमांचे प्रतिकूल स्थितीत रक्षण केले आहे, असेही राष्ट्रपती म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Security of the country is ready the interest of the farmers is witnessed by the president abn
First published on: 26-01-2021 at 00:39 IST