अयोध्येमधील भव्य राम मंदिर उभारण्यासाठी देशाच्या वेगवेगळ्या भागातील रामभक्त देणगी देत आपला खारीचा वाटा उचलताना दिसत आहे. अनेक ठिकाणी तर वेगवेगळ्या धर्मातील लोकांनी या मंदिरासाठी दान केल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत. अगदी तरुणांपासून ते वयस्करांपर्यंत सर्वच वयोगटातील लोक आपआपल्या परीने राममंदिरासाठी दान देत आहेत. अशाच ऋषिकेशमधील एका साधू महाराजांनी तब्बल एक कोटी रुपयांची देणगी राम मंदिरासाठी दिली आहे. विशेष म्हणजे स्वामी शंकर दास या नावाने ओळखल्या जाणारे हे साधू महाराज मागील साठ वर्षांपासून येथील एका गुहेमध्ये वास्तव्यास आहेत. लोकं शंकर दास यांना फक्कड बाबा नावाने ओळखतात. फक्कड बाबा यांनी गुरुवारी ऋषिकेशमधील स्टेट बँक ऑफ इंडियामधील शाखेत पोहचले आणि त्यांनी राम मंदिराच्या बांधकामासाठी देणगी म्हणून एक कोटींचा चेक बँक कर्मचाऱ्यांच्या स्वाधीन केला.
गुहेमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने तब्बल एक कोटींचा चेक आपल्याकडे दिला आहे यावर आधी बँक कर्मचाऱ्यांचा विश्वासच बसत नव्हता. त्यामुळे आधी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी ८३ वर्षीय स्वामी शंकर दास यांच्या बँक खात्यावर खरोखरच इतके पैसे आहेत का याची तपासणी सुरु केली. त्यावेळी खरोखरच त्यांच्या खात्यामध्ये एक कोटींहून अधिक रुपये असल्याचं दिसून आलं आणि त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. फक्कड बाबांनी आपल्या आयुष्यभराची कमाई राम मंदिराच्या उभारणीच्या कार्यासाठी एक कोटींचा निधी दिला आहे. माझ्या आयुष्याचा हेतू आज पूर्ण झाला अशा शब्दांमध्ये फक्कड बाबांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात.
फक्कड बाबा हे टाटवाले बाबांचे शिष्य म्हणून गुहेमध्ये आयुष्य घालवत आहेत. टाटावाले बाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांकडून दान म्हणून मिळणारे पैसे जमा करुन हे पैसे फक्कड बाबांनी आता राम मंदिरासाठी दान केलेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात दान देणाऱ्या फक्कड बाबांसंदर्भात बँकेच्या कर्मचाऱ्यांनी ऋषिकेशमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेमध्ये माहिती दिली. त्यानंतर संघाचे स्थानिक कार्यवाहक कृष्ण कुमार सिंघल यांनी बाबांकडून चेक घेऊन तो राम मंदिराच्या खात्यावर जमा केला.
फक्कड बाबांना हे दान गुप्तदान म्हणून द्यायचं होतं. मात्र संघाच्या पदाधिकाऱ्यांनी बाबांना फोटो काढण्याची विनंती केल्यानंतर त्यांनी चेक देतानाचा फोटो काढून घेतला. संघाचे पदाधिकारी सुदामा सिंघल यांनी ऋषिकेशमध्ये मागील ६० वर्षांपासून एका गुहेत राहणारे फक्कड बाबा हे डाकवाल्या बाबांचे अनुयायी असल्याचे सांगितले.