महाराष्ट्रीय जेवण दिले नाही म्हणून शिवसेनेच्या ११ खासदारांनी नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील केटरिंगची व्यवस्था पाहणाऱया निरीक्षकाचा रोजाचा उपवास मोडल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने याबाबत वृत्त दिले आहे. दरम्यान, शिवसेना नेतृत्त्वाने हा आरोप फेटाळला आहे.
महाराष्ट्र सदनात शिवसेनेच्या खासदारांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात असल्याबद्दल गेल्या आठवड्यातच शिवसेना खासदारांनी संजय राऊत यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन केले होते. त्याच आठवड्यात महाराष्ट्रीय जेवण दिले नाही म्हणून शिवसेनेच्या ११ खासदारांनी महाराष्ट्र सदनातील केटरिंगची व्यवस्था पाहणाऱया निरीक्षकाला जबरदस्तीने चपाती खायला लावून त्याचा रोजाचा उपवास मोडल्याचा आरोप आहे. अर्शद जुबेर एस असे या निरीक्षकाचे नाव असून, या कृतीमुळे त्याला तीव्र दुःख झाले आहे. महाराष्ट्र सदनातील केटरिंगच्या व्यवस्थेचे कंत्राट आयआरसीटीसीकडे आहे. हा प्रकार घडल्यानंतर त्याच्या निषेधार्थ आयआरसीटीसीने महाराष्ट्र सदनातील भोजनाची सर्व व्यवस्था बंद ठेवली आणि तेथील निवासी आयुक्तांकडे घडल्या प्रकाराबाबत लेखी तक्रार केली होती. त्यानंतर निवासी आयुक्त बिपीन मलिक यांनी आयआरसीटीसी आणि अर्शद जुबेर एस यांची माफी मागितली. मलिक यांनी अर्शद जुबेर एस याची स्वतः भेट घेऊन त्याच्याकडे सरकारच्यावतीने माफी मागितली. या संपूर्ण प्रकरणाची महाराष्ट्र सरकारकडून सध्या चौकशी करण्यात येत असून, दोषींविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन महाराष्ट्र सरकारने दिले आहे. महाराष्ट्र सदनात आपल्याला दुय्यम वागणूक देण्यात येत असल्याचा आरोप शिवसेना नेतृत्त्वाने केला असून, रोजा मोडल्याचा आरोप चुकीचा असल्याचे नेतृत्त्वाने स्पष्ट केले आहे.