७, रेसकोर्स रोड.. पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान! डॉ. मनमोहन सिंग यांनी गेली १० वष्रे या बंगल्यात व्यतीत केली. यूपीए सरकारच्या अनेक बैठका, सरकारी चर्चा, अनेक सरकारी पाहुण्यांच्या भेटीगाठी या निवासस्थानाने पाहिल्या. मात्र डॉ. सिंग आता पुन्हा पंतप्रधानपद स्वीकारणार नसल्याने या निवासस्थानात त्यांच्या निरोपाची तयारी सुरू आहे.. त्याशिवाय राजधानीतील ३, मोतीलाल नेहरूनगर या बंगल्यालाही महत्त्व आले आहे. डॉ. सिंग यांचा आता हा नवा पत्ता असणार असल्याने हा बंगलाही त्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे.
‘‘३, मोतीलाल नेहरू रोड बंगल्यात राहायला जाण्याची सर्व कार्यवाही पूर्ण झालेली आहे. आधीच्या निवासस्थानातील सामान नव्या वास्तूत स्थलांतरित करण्याचे काम सुरू आहे. हे काम लवकरच पूर्ण होईल,’’ अशी माहिती पंतप्रधानांचे माध्यम सल्लागार पंकज पचौरी यांनी दिली. पंतप्रधानांच्या पत्नी गुरशरण कौर यांनी नव्या निवासस्थानाला भेट देऊन तेथील कामाचा आढावा घेतल्याची माहितीही पचौरी यांनी दिली.
नव्या निवासस्थानाची डागडुजी करण्याचे कामही वेगात सुरू आहे. बागकाम करणारे कर्मचारी निवासस्थानासमोरी हिरवळ (लॉन) तयार करण्यात व्यग्र आहेत. प्रवेशद्वाराजवळ सुरक्षा केबिन तयार करण्याचे कामही वेगाने सुरू आहे. या बंगल्याला सुरक्षारक्षकांनीही वेढा दिला असून, काही अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली तेथील डागडुजीचे काम सुरू आहे.
दुसरीकडे ७, रेसकोर्ड रोड या निवासस्थानी सामानबांधणीचे कामही वेगाने सुरू आहे. पंतप्रधानांचे पुस्तके, कागदपत्रे, अनेक भेटवस्तू यांच्या बांधणीचे काम सुरू आहे. पंतप्रधानांना त्यांच्या परदेश दौऱ्यात अनेक परदेशी नेत्यांकडून विविध भेटवस्तूंचा नजराणा मिळाला. त्यापैकी काही भेटवस्तू ते आपल्यासोबत घेऊन जाणार आहेत, असे समजते. गेल्या आठवडाभरापासून पंतप्रधानांना अनेक राजकीय नेते, राज्यसभा खासदार यांच्याकडून पुष्पगुच्छे, विविध भेटवस्तू येत आहेत, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली.
पुस्तके, गालिचे आणि बॅट
पंतप्रधान डॉ. सिंग यांचे पुस्तकांवर विशेष प्रेम. नव्या निवासस्थानी जाताना ते आपल्यासोबत विविध पुस्तके नेणार आहेत. त्याचसोबत चार ते पाच शाही गालिचे आणि काही टी-सेट या वस्तूही ते आपल्यासोबत नेणार आहेत. ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी डॉ. सिंग यांना एक क्रिकेट बॅट भेट म्हणून दिली होती. ही बॅटही पंतप्रधानांसोबत नव्या घरी स्थलांतरित होणार आहे.
अडीच एकरमध्ये वसलेले निवासस्थान
तब्बल अडीच एकरमध्ये वसलेले ३, मोतीलाल नेहरू मार्ग हे निवास्थान केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित आहे. चार शयनकक्ष आणि उत्तम बाग-बगिचा असलेल्या या बंगल्यात माजी पंतप्रधानांसाठी एका कार्यालयाचीही सोय आहे.