शेअर बाजाराची आजच्या आठवड्याची सुरुवात तेजीनं झाली आहे. आज (सोमवार) बाजार उघडला तेव्हा सेन्सेक्सने ३६९.९५ अंकांची वाढ नोंदवत ३९,२२४ वर पोहोचला. तर निफ्टी ७५.७० अंकांनी वाढ नोंदवत ११,५४०.१५ वर उघडला. आजपासूनच संसदेच्या पावसाळी अधिवशनाला सुरुवात झाली आहे. यापार्श्वभूमीवर बाजाराची उत्साहाच्या वातारणात सुरुवात झाली.

विश्लेषकांच्या मतानुसार, भारत-चीन सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर या आठवड्यात शेअर बाजाराची दिशा निश्चित होईल. याशिवाय गुंतवणूकदारांची जागतिक घडामोडींवर नजर असेल. त्याचबरोबर आर्थव्यवस्थेत सुधारणांपासून कोविड-१९ची वाढती प्रकरणं तसेच भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर बाजारावर परिणाम होऊ शकतो.

अनेक स्मॉलकॅप कंपन्या आपल्या तिमाही परिणामांची घोषणा करीत आहेत. यामुळे शेअर बाजारात घडामोडी पहायला मिळू शकतात. विश्लेषकांच्या माहितीनुसार, व्याजदरांवर अमेरिकन केंद्रीय बँकेचे निर्णय आणि चलनवाढीमुळे बाजाराला दिशा मिळू शकते.

बाजार खुला होण्यापूर्वी सकाळी ९.१० वाजता सेन्सेक्स २१८.९६ अंकांसोबत म्हणजे ०.६ टक्क्यांच्या वाढीसह ३९,०७३.५१ स्तरावर होता. तर निफ्टीत १५.२० अंकांनी (०.१३ टक्के) वाढ होत ११,४६४.४५ वर पोहोचला होता.

शुक्रवारी शेअर बाजाराची सुरुवात बाजार कोसळल्याने झाली होती. सेन्सेक्स ७५.४६ अंकांनी कोसळत ३८,७६४.८६ स्तरावर उघडला होता. तर निफ्टी १२.१० अंकांच्या किरकोळ घसरणीने ११,४३७.१५ अंकांवर उघडला होता.