फुटीरतावाद्यांना भारतीय राज्यघटनेचा आदर नाही : सुब्रमण्यम स्वामी

शब्बीर शाहला यापूर्वीच ताब्यात घ्यायला हवे होते

सुब्रमण्यम स्वामी (संग्रहित छायाचित्र)

“दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या फुटीरतावाद्यांना भारताच्या राज्यघटनेचा आदर नाही” असे भाजप ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे. दहशतवादी संघटनांना आर्थिक मदत (टेरर फंडिंग) केल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) शब्बीर शाह या फुटीरतावाद्याला अटक केल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही प्रतिक्रीया दिली आहे.

एनआयएने शब्बीर शाहला अटक केलेली ही मोठी आणि महत्वाची कारवाई असली तरी यापूर्वीच त्याला ताब्यात घ्यायला हवे होते असे स्वामी यांनी म्हटले आहे. आपल्याला या फुटीरतावाद्यांना कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई करणे शक्य असल्याचेही त्यांनी सांगितले.

मंगळवारी जम्मू आणि काश्मिर पोलिसांनी शब्बीर शाहशी संबंधीत आणखी एका फुटीरतावादी नेत्याला अटक केली होती. ही व्यक्ती देखील टेरर फंडिंगमध्ये सहभागी असल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पोलिसांना सूचना दिल्या होत्या.

दरम्यान, एनआयएने काश्मिरमधील विभाजनवादी नेते सय्यद अली शाह गिलानी, मिरवाईज उमर फारुख आणि यासिन मलिक यांनाही ईडीने चौकशीसाठी समन्स पाठवले होते. टेरर फंडिंगमध्ये त्यांचाही हात असल्याची माहिती एनआयएकडे होती.

गेल्या एक दशकापासून मनीलॉड्रिंग करत असल्याप्रकरणी शब्बीर शहाला अटक करण्यात आली आहे. शहाला आज दिल्लीत नेले जाणार असून तिथे न्यायालयासमोर त्याला उभे केले जाणार आहे. इडीने यापूर्वी अनेकवेळा शहाला उपस्थित राहण्यासाठी समन्स पाठवले होते. परंतु, तो एकदाही आला नव्हता. दिल्लीच्या न्यायालयाने याच महिन्याच्या प्रारंभीच या फुटीरतावादी नेत्याविरोधात वॉरंट जारी केले होते.

अमरनाथ यात्रेदरम्यान झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी जम्मू काश्मीरमधील सरकार बरखास्त करण्याची मागणी केली होती. जम्मू काश्मीरमध्ये भाजप आणि पीडीपीचे सरकार आहे. मात्र, जम्मू काश्मीरमधील राज्य सरकार बरखास्त करुन तिथे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले होते.  तसेच संपूर्ण जम्मू काश्मीरमध्ये लष्काराला विशेषाधिकार देणारा अफ्स्पा कायदा लागू करण्याची मागणी तसेत ३७० कलम रद्द करुन जम्मू काश्मीरला देण्यात आलेला विशेष राज्याचा कायदा काढून घेण्यात यावा, असेदेखील सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Separatists have no respect for indian constitution says subramanyam swamy