जगातील सर्वात मोठ्या कोविड-१९ लसीकरण मोहिमेला आजपासून भारतात सुरुवात झाली. देशभरातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सकाळपासून कोविड योद्ध्यांना लस दिली जात आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना या पहिल्या टप्प्यात प्राधान्याने लस दिली जात असून त्यांना सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला यांनी देखील साथ दिली आहे. आपल्याच कंपनीने बनवलेल्या ‘कोविशिल्ड’ या लसीचा डोस त्यांनी शनिवारी घेतला. आपल्या ट्विटर हँडलवरुन पुनावाला यांनी याचा व्हिडिओ शेअर करत भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.

पुनावाला यांनी आपल्या ट्विटरवरुन लस घेतल्याची माहिती देताना म्हटलं की, “जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेला झालेल्या सुरुवात झाली याला यश लाभो अशी मी भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सदिच्छा देतो. या ऐतिहासिक प्रयत्नांचा आणि लसीच्या सुरक्षेबाबतच्या आणि प्रभावीपणाच्या दखलपात्रतेने मला मोठा सन्मान मिळवून दिला आहे. आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत मी देखील कोविडची लस घेण्याच्या मोहिमेत सहभागी होत आहे”

दरम्यान, शनिवार सकाळी १०.३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या लसीकरण मोहिमेचे उद्घाटन झाले. या मोहिमेत करोनायोद्धय़ांना सर्वात आधी लशीचा लाभ मिळणार असून, यांपैकी काही जणांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. लसीकरण मोहिमेच्या प्रारंभावेळी लशींचा पुरवठा आणि वितरणावर देखरेख ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘को-विन’ अ‍ॅपचे लोकार्पणही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले.