सात वर्षांच्या एका ब्राह्मण विद्यार्थिनीला तिच्या शिक्षकाने सक्तीने अंडे खाऊ घातल्याचा प्रकार समोर आला आहे. सरकारी शाळेत ही घटना घडली. सात वर्षांच्या या मुलीला शिक्षकाने अंडे खाण्याची सक्ती केली. ही मुलगी दुसऱ्या इयत्तेत शिकते. अंडी खाणं आपल्या प्रकृतीसाठी चांगलं असतं असं सरकारी शाळेतल्या शिक्षकाने विद्यार्थिनीला सांगितलं आणि तिला अंडे खाण्याची सक्ती केली. या घटनेनंतर विद्यार्थिनीने तिच्या वडिलांना सगळा प्रकार सांगितला. या विद्यार्थिनीचे वडीलही त्याच शाळेत शिक्षक आहेत. त्यांनी या संदर्भात आवाज उठवला आहे. तसंच ब्राह्मण समुदाय या प्रकारामुळे आक्रमक झाला आहे.
नेमकी काय घडली ही घटना?
कर्नाटकातल्या शिमोगा जिल्ह्यातली ही घटना आहे. सात वर्षांच्या मुलीच्या वडिलांचं नाव श्रीकांत असं आहे. त्यांनी या प्रकाराविरोधात त्यांच्या मुलीला सक्तीने अंडे खाऊ घालणाऱ्या शिक्षकाची तक्रार केली आहे. या प्रकरणी आता चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार श्रीकांत यांनी सांगितलं की आम्ही तिला आत्तापर्यंत कधीही मांसाहारी जेवण दिलेलं नाही. मात्र दोन दिवसांपूर्वी अंडे खाण्यासाठी तिला शिक्षकाने सक्ती केली. पुट्टास्वामी असं त्यांचं नाव आहे आणि त्यांच्या विरोधात तक्रार केली आहे. माझी मुलगी अंडे खाल्ल्याने आजारी पडली तसंच तिच्यावर या गोष्टीचा परीणाम झाला असं श्रीकांत यांनी म्हटलं आहे. तसंच शाळा प्रशासनावर ब्राह्मण समाजाने धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला आहे.
मुलीचे वडील श्रीकांत काय म्हणाले?
श्रीकांत यांनी असंही म्हटलं आहे की माझी सात वर्षांची मुलगी अंडे खायला नकार देत होती तरीही तिला खायचं म्हणून सक्ती करण्यात आली. आता या प्रकरणी श्रीकांत यांनी बीईओ कार्यालयात तक्रार केली आहे. माझ्या मुलीला अंडे खाण्याची सक्ती करणारे शिक्षक आणि शाळेचे मुख्याध्यापक यांच्यावर कारवाई केली जावी अशीही मागणी त्यांनी केली आहे. दुसरीकडे पुट्टास्वामी यांनी मी अंडे खाण्याची त्या मुलीला सक्ती केली नाही मी तिला फक्त अंडे खाण्याचे महत्त्व समजावून सांगितले असा दावा केला आहे. माध्यान्ह भोजनाच्या वेळी मुलीने स्वतःहून अंडे खाल्लं आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. शिक्षण विभागा पर्यंत हे प्रकरण गेल्याने या प्रकरणाची चौकशी सुरु झाली आहे. माध्यान्ह भोजन देत असताना हा प्रकार घडल्याचं टाइम्स ऑफ इंडियाने म्हटलं आहे.
या मुलीचे वडील श्रीकांत म्हणाले की शिक्षक पुट्टास्वामी यांचं आणि माझं काही शत्रुत्व नाही. मात्र त्यांनी जे कृत्य केलं ते चुकीचं आहे. त्यामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे तसंच मला हे प्रकरण फार खेचण्यात अर्थ वाटत नाही असंही श्रीकांत यांनी म्हटलं आहे.