पाकिस्तानातील आयएसआय या गुप्तचर संस्थेच्या काही लोकांना ओसामा बिन लादेनचा ठावठिकाणा माहिती असू शकेल, पण अमेरिकी लष्कराने लादेनवर जी लष्करी कारवाई केली ती एकतर्फी होती; त्याच्याशी आयएसआयचा संबंध नव्हता, असे व्हाइट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
राष्ट्रीय  सुरक्षा उपसल्लागार बेन ऱ्होडस यांनी एमएसएनबीसीला सांगितले की, आम्हाला लादेनचा ठावठिकाणा माहिती नव्हता असे बोलले जाते, पण त्यात तथ्य नाही. लादेन हा अबोटाबादमध्ये लपलेला आहे हे आम्हाला माहिती होते. आयएसआयमध्ये असे काही लोक असू शकतील, ज्यांना त्याचा ठावठिकाणा माहिती असेल पण त्याचेही ठोस पुरावे नाहीत.
अमेरिकी शोध पत्रकार सेमूर हर्ष यांनी असा दावा केला होता की, पाकिस्तानी लष्कर प्रमुख व आयएसआय प्रमुख यांना अमेरिकेच्या कारवाईची माहिती होती व एका गुप्तचर अधिकाऱ्यानेच लादेनचा ठावठिकाणा त्यांना सांगितला होता.
बेन ऱ्होडस यांनी सांगितले की, आम्ही जेव्हा पाकिस्तानला लादेनवरील कारवाईची माहिती दिली तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले व  अमेरिका-पाकिस्तान यांच्यातील संबंधही त्यामुळे बिघडले होते. पाकिस्तानने या मोहिमेबाबत अमेरिकेने काहीच माहिती अगोदर न दिल्याने त्रागा केला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Seymour hershs osama bin laden story that rings true
First published on: 14-05-2015 at 02:39 IST