दिल्लीच्या जामा मशिदीचे चौदावे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांचे वारसदार म्हणून त्यांचे १९ वर्षांंचे पुत्र शाबान बुखारी यांची निवड करण्यात आली आहे.
बुखारी हे इ.स २००० पासून या पदावर असून आपला मुलगा धार्मिक बाबीत योग्य क्षमता धारण करीत असल्याने त्याची निवड करण्यात आल्याचे बुखारी यांनी सांगितले. शाबान हा एका खासगी विद्यापीठात समाजकार्य विषयात पदवीसाठी अभ्यास करीत आहे. २२ नोव्हेंबरला नायब शाही इमाम (उप इमाम) म्हणून त्याची नेमणूक केली जाईल. त्या वेळी जगातील एक हजार धार्मिक नेते उपस्थित असतील.
गेली ४०० वर्षे दिल्लीच्या जामा मशिदीच्या इमामाचे पद एकाच घराण्याकडे आहे. जामा मशिदीचा इतिहास १६५६ पूर्वीचा असून मुघल सम्राट शहाजहान याने अब्दुल गफूर बुखारी यांना शाही इमाम घोषित केले होते.