गेल्या २ ऑक्टोबरला वर्धमान येथे झालेल्या बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी शाहनूर आलम याने त्याचे जमात उल मुजाहिद्दीन बांगलादेश या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा कबुलीजबाब दिला असून या संघटनेचे जाळे पश्चिम बंगालमध्ये पसरवले असल्याचेही सांगितले.
शाहनूर हा बॉम्बस्फोटात सामील असल्याचे जाबजबाबातून स्पष्ट झाले असून तो जमात उल मुजाहिद्दीन बांगलादेश या संघटनेच्या दहशतवादी गटाच्या संपर्कात होता असे वर्धमानचे अतिरिक्त पोलीस महासंचालक पल्लव भट्टाचारजी यांनी सांगितले.
जमात उल मुजाहिद्दीन बांगलादेश ही दहशतवादी संघटना बांगलादेशच्या विरोधात काम करत आहे व या संघटनेत सामील होण्यासाठी त्याच्यावर दबाव आणला गेला व त्यामुळे त्याने शेजारच्या पश्चिम बंगालमध्ये आश्रय घेतला, असे जाबजबाबात स्पष्ट झाल्याचे त्यांनी सांगितले.शाहनूर याने बांगलादेशमधील संघटनेच्या जाळ्याची माहिती व आसाममध्ये असलेल्या दहशतवाद्यांची माहिती दिली काय असे विचारले असता ते म्हणाले की, जमात उल मुजाहिद्दीन बांगलादेश या संघटनेचे फार मोठे जाळे आसाममध्ये असण्याची शक्यता नाही, काहीजण बेपत्ता असले तरी आम्ही त्यांच्या मागावर आहोत पण आसाममधील स्थिती गंभीर नाही.
काश्मीर हल्ल्यात हात नाही-पाकिस्तान
इस्लामाबाद : काश्मीर खोऱ्यात सध्या सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांशी पाकिस्तानचा संबंध आहे, या भारताच्या आरोपाचे पाकिस्तान सरकारने खंडन केले आहे. काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात आमचा हात नाही, अशी कांगावाखोर भूमिका पाकिस्तानने घेतली आहे.‘‘भारताचे आरोप बिनबुडाचे असून, आम्ही ते नामंजूर करत आहोत. पाकिस्तान हे राष्ट्रही दहशतवादाच्या विळख्यात सापडले आहे. दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी पाकिस्तान सरकारही प्रयत्न करत आहे,’’ असे पाकिस्तानच्या परराष्ट्र व्यवहार विभागाने सांगितले.