Shama Parveen अलकायदाची महिला दहशतवादी शमा परवीनला गुजरात एटीएसने अटक केली आहे. बंगळुरुमध्ये ही कारवाई करण्यात आली. कर्नाटकात राहणारी शमा परवीन अल कायदाचं मॉड्युल चालवत होती. या दहशतवादी महिलेला गुजरात एटीएसने आता अटक केली आहे. तिची चौकशी सुरु करण्यात आली आहे. शमा परवीन मूळची झारखंडची आहे. ती कर्नाटकातल्या बंगळुरुमध्ये राहते आहे अशी माहिती मिळाल्यानंतर एटीएसने छापेमारी करुन तिला अटक केली.

३० वर्षांची शमा परवीन अल कायदाशी संबंधित

३० वर्षांची शमा परवीन ही AQIS ची मुख्य दहशतवादी महिला आहे. शमा परवीन ही मूळची झारखंडची आहे. ती बंगळुरुमध्ये वास्तव्य करत होती. तिचं सोशल मीडिया अकाऊंटही रडारवर होतं अशी माहिती एटीएसने दिली आहे. शमा परवीन बेरोजगार आहे. तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ती चिथावणी देणाऱ्या गोष्टी, व्हिडीओ, पोस्ट या सगळ्या पोस्ट करत होती. देशाविरोधातही चिथावणी देत होती. शमा पाकिस्तानशी संबंधित आहे याचे डिजिटल पुरावेही सापडले आहेत. गुजरातचे गृहराज्य मंत्री हर्ष संघवी यांनी या कारवाईबाबत एटीएसचं अभिनंदन केलं आहे. एटीएसला मिळालेलं हे मोठं यश असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

शमा परवीन काय करत होती?

शमा इन्स्टाग्राम आणि इतर सोशल प्लॅटफॉर्मवरुन जिहादी पोस्ट, दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पोस्ट, व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत होती. तिच्या फॉलोअर्सना ती चिथावत होती. अल कायदा या दहशतवादी संघटनेला पाठिंबा देत होती. सरकार आणि भारताचं संविधान याच्या विरोधी वातावरण कसं तयार होईल यासाठी हेतुपुरस्सर वातावरण निर्मितीचं काम शमा करत होती असं एटीएसने स्पष्ट केलं आहे.IANS या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिलं आहे.

शमाला अटक कशी करण्यात आली?

शमा बंगळुरुतल्या हेब्बल भागात एका भाडे तत्त्वावरच्या घरात तिच्या लहान भावासह वास्तव्य करत होती. शमाचा भाऊ एका कंपनीत काम करतो. या घरावर एटीएसने छापा मारला आणि शमाला अटक करण्यात आली. तिच्या अटकेनंतर तिला कोर्टात नेण्यात आलं. त्यानंतर ट्रांझिट वॉरंट घेऊन गुजरातला आणलं गेलं. या मोहिमेची तयारी एटीएसकडून मागच्या काही दिवसांपासून सुरु होती. जे लोक चिथावणी पसरवण्याचं काम करतात, देश विरोधी गोष्टी करतात त्यांच्यावर एटीएसची नजर होतीच. त्यात शमाचाही समावेश होता. शमा अशा तीन जणांना फॉलो करत होती ज्यांनी काही दिवसांपूर्वी दहशतवादी कारवाया केल्या प्रकरणी अटक करण्यात आली.