Sharad Pawar On Bihar Assembly Election 2025 : बिहार विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला. या निवडणुकीत एनडीएने मोठा विजय मिळवत तब्बल २०२ जागा जिंकल्या, तर महाआघाडीने फक्त ३५ जागा जिंकल्या आहेत. निवडणुकीत आलेल्या अपयशामुळे महाआघाडीला मोठा धक्का बसला. दरम्यान, बिहार निवडणुकीच्या निकालावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

माध्यमांशी संवाद साधताना शरद पवारांनी बिहार निवडणुकीचं विश्लेषण केलं. मात्र, यावेळी बोलताना शरद पवारांनी निवडणूक आयोगाला सूचक इशाराही दिला आहे. बिहारमध्ये निवडणुकीच्या आधी महिलांच्या खात्यात दहा-दहा हजार रुपये देण्यात आले, त्यामुळे निवडणुका पारदर्शक पद्धतीने होतात का? याचा निवडणूक आयोगाने गांभीर्याने विचार करावा, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.

शरद पवार काय म्हणाले?

“बिहारच्या निवडणुकीचं मतदान झाल्यानंतर मी काही लोकांशी बोललो तेव्हा मला अशी माहिती मिळाली की बिहारच्या निवडणुकीत मतदान महिलांनी हातामध्ये घेतलं होतं. ज्या अर्थी महिलांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदानात सहभाग घेतला, याचा अर्थ महिलांना त्यांच्या खात्यात १० हजार रुपये देण्याच्या योजनेचा हा परिणाम असावा. महाराष्ट्रात देखील निवडणुकीच्या आधी अधिकृत पैसे वाटले, म्हणजे प्रत्येक मताला पैसे देतात तसे नाही, तर सरकारच्या वतीने योजनेच्या माध्यमातून पैसे दिले, म्हणजे लाडकी बहीण योजना”, असं शरद पवार म्हणाले.

“आता प्रश्न असा आहे की यापुढे होणाऱ्या निवडणुकीत ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांनी मतदानाच्या आधी अशा प्रकारे पैशांचं वाटप करून निवडणुकीला सामोरं जाण्याची भूमिका घेतली तर निवडणुकीवरील लोकांच्या विश्वासाला धक्का बसेल. एवढ्या मोठ्या प्रमाणात पैशांचं वाटप करणं हे योग्य आहे का? याचा विचार सर्वांनी केला पाहिजे, तसेच निवडणूक आयोगानेही याचा गांभीर्याने याचा विचार केला पाहिजे. निवडणुका पारदर्शक पद्धतीने झाल्या पाहिजेत. १० हजार रुपये देणं, ही रक्कम काही लहान नाही. त्यामुळे निवडणुका पारदर्शक पद्धतीने होतात का? याबाबत लोकांच्या मनात नक्की शंका आहेत आणि याचा विचार निवडणूक आयोगाने केला पाहिजे”, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.