निवडणूक झाल्यावर देशातले सत्ताधारी हिमालयात जाऊन बसले आहेत असं म्हणत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. ज्यांच्या हाती सत्ता आहे ते हिमालयात जाऊन बसले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं केदारनाथ मंदिरात जाणं आणि एक्झिट पोल हे दोन्ही नौटंकी आहे अशीही टीका शरद पवार यांनी केली आहे. आज देशात एक वेगळीच परिस्थिती आहे. देश कोणत्या वाटेवर जाईल, सत्ता कोणत्या विचारांच्या पक्षाची येईल हे स्पष्ट व्हायला अवघे दोन दिवस उरले आहेत असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. शरद पवार मुंबईतल्या रोजा इफ्तार पार्टीत सहभागी झाले होते त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एवढंच नाही तर यावेळी शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांवरही टीका केली. प्रसारमाध्यमांनी देशात एक वेगळं वातावरण निर्माण केलं आहे. काही प्रसारमाध्यमं सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले बनले आहेत असंही शरद पवारांनी म्हटलं आहे. मला रविवारपासून काही फोन येत आहेत. चिंता व्यक्त केली जात आहे, मात्र मी सगळ्यांना सांगतो आहे की घाबरू नका दोन दिवसातच सगळं चित्र स्पष्ट होणार आहे.

निवडणुका होतील, निकाल लागत रहातील मात्र सध्या जे सत्तेवर आहेत ते हिमालयात जाऊन बसले आहेत. राजधानी दिल्ली सोडून त्यांनी हिमालयात जाणं पसंत केलं आहे असं म्हणत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. आम्ही इथे बंधुभाव जपण्याचा संदेश देत आहोत तर काही पक्षातले लोक वेगळाच विचार करताना दिसत आहेत. समाजातला बंधुभाव, एकता कशी टीकून राहिल? रविवारपासून नाटकं सुरू आहेत ती बघा आणि सोडून द्या असाही सल्ला शरद पवारांनी दिला. देशात परिवर्तन घडेल यावर माझा विश्वास आहे त्यासाठी मी अल्लाहकडे दुवा मागणार आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

लोकसभा निवडणुकीचे सातही टप्पे पार पडले आहेत. आता सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे निकालाच्या दिवसाची म्हणजेच २३ मे या दिवसाची. २३ मे रोजी देशात पुन्हा कुणाची सत्ता येणार हे स्पष्ट होणार आहे. मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा शरद पवार हे इफ्तार पार्टीत सहभागी झाले त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar criticized pm modi on his kedarnath yatra in mumbai iftar party
First published on: 20-05-2019 at 20:16 IST