देशात भाजपाला पर्याय उभा करण्याच्या दिशेने राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरू असल्याचं सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. दिल्ली विधानसभेचे माजी अध्यक्ष योगानंद शास्त्री आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत ते प्रवेशकर्ते होतील. काँग्रेसमध्ये दोन टर्म त्यांनी मुख्यमंत्री म्हणून काम केलं आहे. त्यानंतर काँग्रेसची फेररचना झाली. त्यामुळे नाराज असलेले योगानंद शास्त्री आज राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत.

याप्रसंगी शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “दिल्ली शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचं संघटन नाही. त्यामुळे आम्हाला इथे जास्त मेहनत करण्याची गरज आहे. अनेक राज्यांमध्ये आमचे साथी पक्षाचं संघटन बनवण्याचे प्रयत्न करत आहेत. इथं आमच्यासोबत काम करणारे अनेक जण आहेत. मात्र देशाच्या राजधानीमध्ये पक्षाची जी स्थिती असायला हवी, त्यात सुधारणा करण्यासाठी आम्ही अनेक लोकांसोबत चर्चा करत होतो आणि मला आनंद आहे की दिल्ली विधानसभेचं अध्यक्षपद ज्यांनी सक्षमपणे सांभाळलं, एक चांगला अध्यक्ष विधानसभेचं काम कसं चालवू शकतो याचा आदर्श शास्त्रीजींनी देशासमोर घातला आहे. गेल्या काही दिवसांपासून आमची शास्त्रीजींशी चर्चा सुरू होती की त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिल्लीतल्या संघटनाची जबाबदारी त्यांनी स्वतःकडे घ्यावी. मला आनंद आहे की आमच्या विनंतीचा स्वीकार त्यांनी केला. फक्त त्यांनीच नव्हे तर त्यांच्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांनीही राष्ट्रवादीमध्ये काम करण्याची तयारी दाखवली. आज राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मी या सर्वांचं स्वागत करतो”.

सामान्यांना भाजपाला पर्याय हवा आहे, असं म्हणत राष्ट्रवादी त्या मार्गाने प्रयत्न करत असल्याचंही पवारांनी सांगितलं. ते म्हणाले, “देशातल्या काही राज्यांत येत्या काही दिवसांत निवडणुका आहेत. त्यामुळे आमची जबाबदारी आहे की सामान्य जनतेला सांप्रदायिक शक्तीला बाजूला सारण्यासाठी जो पर्याय उभा करण्याची आवश्यकता आहे, ज्या प्लॅटफॉर्मची आवश्यकता आहे. तो प्लॅटफॉर्म मिळवून देण्याच्या दिशेने आम्ही तयारी करत आहोत. आज त्याच्याबद्दल काही बोलणार नाही. पण आम्ही याच दिशेने प्रयत्न करत आहोत आणि आम्हाला यश नक्की मिळेल कारण देशवासियांना BJP च्या हुकुमशाहीमुळे पुढे येणाऱ्या सांप्रदायिक शक्तींमुळे देशातली शांतता भंग होत आहे. त्यामुळे लोकांना आता पर्याय हवा आहे. आणि तो देण्याची प्रक्रिया आम्ही सुरू करणार आहोत. यासाठी आधी आम्हाला आमचा पाया मजबूत करायला हवा. मला आनंद आहे की शास्त्रीजीने दिल्लीची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेण्याची तयारी दाखवली”.