केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री शशी थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांचा संशयास्पद मृत्यू शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास उघडकीस आल्याने दिल्लीच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. येथील लीला पॅलेस हॉटेलातील ३४५ क्रमांकाच्या खोलीत पुष्कर यांचा मृतदेह आढळून आला. सुनंदा यांनी आत्महत्या केली असावी असा संशय दिल्ली पोलिसांनी व्यक्त केला आहे.
थरूर यांच्या घरी रंगकाम सुरू असल्याने हे दाम्पत्य या हॉटेलात राहात होते. काँग्रेस कार्यकारिणीच्या अधिवेशनासाठी थरूर दिवसभर उपस्थित होते. रात्री ते हॉटेलात परतले तेव्हा खोली आतून बंद होती. थरूर यांनी खोलीत प्रवेश केला तेव्हा सुनंदा झोपल्याचे त्यांना वाटले. मात्र काही क्षणांतच त्या मृत झाल्याचे लक्षात येताच त्यांना धक्काच बसला.  तात्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आले. हॉटेल कर्मचाऱ्यांनी दुपारी साडेतीनला सुनंदा यांना पाहिले होते.
पाकिस्तानी महिला पत्रकार मेहेर तरार आणि शशी थरूर यांच्यातील ट्विट आणि लघुसंदेशांमुळे सुनंदा पुष्कर गेल्या काही दिवसांपासून वैफल्यग्रस्त होत्या. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मेहेर यांनी थरूर यांच्याविषयी केलेल्या ट्विप्पणींमुळे अस्वस्थ झालेल्या सुनंदा यांनी मेहेर यांना ट्विटरद्वारे उत्तर दिले होते. तसेच थरूर यांनीही दोनच दिवसांपूर्वी ट्विट करून सुनंदा आणि आपले वैवाहिक जीवन उत्तम सुरू असून माध्यमांनी आमच्या खासगी आयुष्यात जास्त ढवळाढवळ करू नये असे सुनावले होते. मेहेर आणि थरूर यांच्यातील कथित प्रेमप्रकरणामुळे अस्वस्थ झाल्याच्या पाश्र्वभूमीमुळे सुनंदा यांच्या मृत्यूचे गूढ वाढले आहे. सुनंदा आणि थरूर यांचा २०१० मध्ये विवाह झाला होता. दोघांचेही यापूर्वी दोनदा विवाह झाले होते. सुनंदा या मूळच्या काश्मीरच्या होत्या. शिव मेनन या आपल्या मुलाला सुनंदा यांनी जिद्दीने वाढविले होते.
तरार यांना धक्का
सुनंदा यांच्या मृत्यूमुळे आपल्याला जबर धक्का बसला असल्याची प्रतिक्रिया पाकिस्तानी महिला पत्रकार मेहेर तरार यांनी व्यक्त केली आहे. सुनंदाचा मृत्यू ही घटना अविश्वसनीय आणि धक्कादायक आहे, अशी ट्विप्पणी मेहेर यांनी केली आहे. या घटनेवर मी नेमकी काय प्रतिक्रिया देऊ हेच सुचत नसल्याचेही मेहेर यांनी स्पष्ट केले आहे.