सरकारी जाहिरातींच्या संदर्भात नियमांची पायमल्ली करून एका खासगी फर्मबाबत पक्षपात केल्याच्या प्रकरणात दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना राज्याच्या लोकायुक्तांनी निर्दोष ठरवले आहे.

वेद पाहुजा अ‍ॅण्ड असोसिएट्स या फर्मचा फायदा करून देण्यासाठी दीक्षित यांनी नियमांना बगल दिल्यामुळे सरकारचे ७३.२८ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप तक्रारकर्ते अशोक कुमार यांनी केला होता. माहिती व प्रसिद्धी महासंचालकांच्या किंवा जाहिरात आणि दृश्य प्रसिद्धी संचालनालयाच्या पॅनेलवर नसूनही या फर्मला दिल्ली सरकारच्या प्रसिद्धीच्या सर्व कामांसाठी सल्लागार नेमण्यात आल्याचे त्यांनी म्हटले होते.

ज्या प्रकरणात आरोप ठामपणे मांडण्यासाठी तक्रारकर्ता पुढे येत नाही, ते आणखी लांबवल्याने काहीही साध्य होणार नाही. शिवाय सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांमुळे तक्रारकर्त्यांचे म्हणणे सिद्ध होत नाही, असे लोकायुक्त न्या. रेवा खेत्रपाल यांनी म्हटले आहे. शीला दीक्षित यांना उत्तर प्रदेशातील काँग्रेसच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार म्हणून नियुक्त करण्यात आल्यानंतर सुमारे दोन आठवडय़ांनी हा आदेश आला आहे.