Shibu Soren : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचं निधन झालं आहे. प्रदीर्घ काळापासून ते आजारी होते. दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात वयाच्या ८१ व्या वर्षी शिबू सोरेन यांनी अखेरचा श्वास घेतला. झारखंडच्या नेमरा गावातल्या आदिवासी कुटुंबात शिबू सोरेन यांचा जन्म झाला होता. लाखो आदिवासी बांधवांसाठी शिबू सोरेन अगदी देवासमान होते. शिबू सोरेन यांची कारकीर्द बरीच वादग्रस्त ठरली. तरीही तीन वेळा त्यांनी मुख्यमंत्रिपद भुषवलं होतं.
दाढीवर हात फिरवायचे शिबू सोरेन आणि…
शिबू सोरेन यांची लांब दाढी हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खासियत होती. शिबू सोरेन आपल्या लांब दाढीवरुन एक हात फिरवायचे आणि त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारत असे. झारखंडच्या राजकीय इतिहासात आदिवासी समाजाला महत्त्वाचं स्थान मिळवून देण्याचं काम शिबू सोरेन यांनी केलं होतं. शिबूर सोरेन यांचं आयुष्य संघर्षाने आणि वादांनी व्यापलेलं होतं. ११ जानेवारी १९४४ ला शिबू सोरेन यांचा जन्म झाला होता. शिबू सोरेन यांचे वडील सोबरन यांची गणना सर्वाधिक शिकलेल्या आदिवासी बांधवांमध्ये होत होती. शिबू सोरेन यांच्या पत्नी रुपी किस्कू या होत्या. शिबू सोरेन आणि रुपी यांना तीन मुलं आणि एक मुलगी आहे. दुर्गा, हेमंत आणि बसंत ही त्यांची तीन मुलं आहेत. तर अंजली ही त्यांची कन्या आहे.
शिबू सोरेन यांच्या वडिलांची हत्या
शिबू सोरेन यांचे वडील शिक्षक होते. व्याजाने पैसे देऊन कर्जाच्या दुष्टचक्रात गरीबांना अडकवणाऱ्या सावकरांच्या विरोधात त्यांनी लढा दिला. शिबू सोरेन यांच्या वडिलांची हत्या या कारणाने आणि जमिनीच्या वादातून झाली. शिबू सोरेन अवघ्या सात वर्षांचे होते तेव्हाच त्यांच्या डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरपलं. या घटनेनंतर शिबू सोरेन यांचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. न्याय आणि समानता हे प्रत्येकाचे अधिकार आहेत ही शिबू यांची धारणा अधिक दृढ होत गेली. शिबू सोरेन यांनी सुरुवातीला लाकडच्या मोळ्या विकण्याचं काम केलं. त्यानंतर त्यांनीही वडिलांप्रमाणे सावकारी प्रथेच्या विरोधात लढा दिला.
१९७० च्या दशकात राजकारणात पाऊल
१९७० च्या दशकात शिबू सोरेन राजकारणात आले. १९७५ मध्ये त्यांनी बिगर आदिवासी लोकांसाठीही आंदोलन केलं. या आंदोलनात सात जणांचा मृत्यू झाला. ज्यानंतर शिबू सोरेन यांच्यावर चिथावणी देण्याचा आरोप झाला होता. १९७७ मध्ये त्यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली.मात्र ही निवडणूक ते हरले. त्यानंतर १९८० मध्ये ते लोकसभेत खासदार झाले. यानंतर १९८९, १९९१ आणि १९९६ या वर्षांमध्ये शिबू सोरेन लोकसभा खासदार म्हणून निवडून गेले. २००२ मध्ये त्यांना राज्यसभेवर खासदार म्हणून निवडलं गेलं. मात्र त्यानंतर त्यांनी या खासदारकीचा राजीनामा दिला आणि दुमका मतदारसंघातून लोकसभेची पोटनिवडणूक लढवत विजय मिळवला. २००६ मध्ये शिबू सोरेन हे केंद्र सरकारमध्ये कोळसा मंत्री झाले.
१९९४ चं ते हत्याकांड आणि शिबू सोरेन यांचं नाव
शिबू सोरेन केंद्रात कोळसा मंत्री असताना शशि नाथ हत्याकांड प्रकरण समोर आलं होतं. दिल्लीच्या एका न्यायालयाने शशि नाथ हत्या प्रकरणात शिबू सोरेन यांचा दोषी ठरवलं. शशि नाथ हे सोरेन यांचे सचिव होते. या हत्या प्रकरणात आरोप झाल्याने शिबू सोरेन यांचं मुख्यमंत्रिपद गेलं होतं. दरम्यान २००९ मध्ये त्यांनी पुन्हा एकदा झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पण भाजपाने पाठिंबा काढून घेतल्याने काही महिन्यांतच त्यांना राजीनामा द्यावा लागला. २००९ मध्ये शिबू सोरेन यांनी विधानसभेसाठीची पोटनिवडणूक लढवली होती आणि ९ हजार मतांनी ते जिंकले होते. दरम्यान हत्याकांडाशिवाय इतरही गुन्हे शिबू सोरेन यांच्या विरोधात दाखल होते पण त्यांना लोकांचं अमाप पाठबळ लाभलं. ज्या पाठिंब्यावर त्यांनी त्यांची राजकीय कारकीर्द गाजवली.
१० दिवसांसाठी मुख्यमंत्रिपद भुषवलं
शिबू सोरेन हे २००५ मध्ये पहिल्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री झाले. पण अवघ्या दहा दिवसात त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर २००८ आणि २००९ या दोन्ही वर्षी त्यांनी शपथ घेतली पण मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ ते पूर्ण करु शकले नाहीत. झामुमो अर्थात झारखंड मुक्ती मोर्चा स्थापन करण्याचं श्रेय त्यांना जातं.
शिबू सोरेन यांना म्हटलं जायचं दिशोम गुरु
शिबू सोरेन यांना दिशोम गुरु असंही संबोधलं जात असे. सावकारी प्रथेविरोधात शिबू सोरेन यांनी चळवळ उभी केली होती. त्यासाठी त्यांनी आदिवासी समाजाला एकत्र आणण्याचं काम केलं. धन कटनी आंदोलन खूप गाजलं होतं. या आंदोलनाच्या दरम्यान ज्या शेतात धानाची कापणी होत असे त्या शेताच्या बांधावर आदिवासी युवक धनुष्य बाण घेऊन उभे राहायचे. हे आंदोलन शिबू सोरेन यांच्या नेतृत्वात झालं होतं. याच आंदोलनादरम्यान त्यांना दिशोम गुरु असं लोक संबोधू लागले. संताली भाषेत दिशोम गुरु या शब्दाचा अर्थ होतो देशाचा गुरु. लोक त्यांना त्याच नावाने हाक मारु लागले होते, जे चांगलंच प्रचलितही झालं होतं.