शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे १६ जून रोजी अयोध्या दौरा करणार आहेत. त्याचसंदर्भात माहिती देण्यासाठी संजय राऊत यांनी योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. आमच्यात सकारात्मक चर्चा झाली. उद्धव ठाकरे यांचं स्वागत करण्याचा निर्णय योगी आदित्यनाथ यांनी घेतला आहे असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. संजय राऊत यांनी योगी आदित्यनाथ यांच्यासोबत फोटो ट्विट करत ही माहिती दिली आहे.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे १६ जून रोजी अयोध्येत जाणार आहेत. त्यांच्यासोबत शिवसेनेचे खासदारही असणार आहेत. अयोध्येतील रामलल्ला मंदिरात जाऊन प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेणार आहेत. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे अयोध्येला जाणार हे आधीच ठरलं होतं. आता १६ जूनला उद्धव ठाकरे शिवसेना खासदारांसह अयोध्येत जाऊन प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेणार आहेत.

याआधी २०१८ च्या नोव्हेंबर महिन्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब अयोध्येत भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी रामलल्लाचेही दर्शन घेतले होते.तसेच राम मंदिराच्या निर्मितीचा मुद्दा पुढे आणून त्यांनी सरकारला कोंडीत पकडण्याचाही प्रयत्न केला होता. आधी राम मंदिराच्या बांधणीला कधी सुरुवात करणार ते सांगा त्यानंतरच युतीची बोलणी होईल अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली होती. त्यावेळी शिवसेना-भाजपा यांच्यात अत्यंत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.