एअर इंडियासहित भारतीय विमान कंपन्यांच्या महासंघाने बंदी टाकल्यामुळे रेल्वेने प्रवास करण्याची वेळ आलेल्या रवींद्र गायकवाड यांच्यामागील शुक्लकाष्ठ काही केल्या संपायला तयार नाही. रवींद्र गायकवाड शुक्रवारी रात्री ऑगस्ट क्रांती राजधानी एक्स्प्रेसने मुंबईच्या दिशेने रवाना झाले. मात्र, त्यांचा हा रेल्वेप्रवासही सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या रेल्वे प्रवासात अनेक रंजक घडामोडी घडल्या असून काही वेळापूर्वीच रवींद्र गायकवाड गाडीतून अचानकपणे गायब झाल्याचे वृत्त आहे. एबीपी माझाच्या माहितीनुसार, माध्यमांचा ससेमिरा मागे लागल्यामुळे रवींद्र गायकवाड वापी स्थानकावर उतरले. याठिकाणी त्यांच्या समर्थकांनी खासगी वाहनांची व्यवस्था केली होती. यापैकी एका गाडीने ते सध्या उस्मानाबादच्या दिशेने रवाना झाले आहेत. तत्पूर्वी काल रात्री मथुरा स्थानकातही गायकवाड यांच्याबरोबर असणाऱ्या सहकाऱ्याच्या छातीत दुखू लागल्यामुळे ऑगस्ट क्रांती एक्स्प्रेस बराच वेळ थांबविण्यात आली होती.

सूत्रांच्या माहितीनुसार, गायकवाड यांनी ऑगस्ट क्रांती एक्स्प्रेसच्या एसी टू टियर बोगीमध्ये तीन तिकीटे आरक्षित केली होती. मात्र, मथुरा स्थानकात गाडी आल्यानंतर त्यांच्या एका सहकाऱ्याच्या छातीत दुखू लागले. यावेळी गायकवाड यांनी विनंती केल्याने गाडी थांबविण्यात आली आणि डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. दरम्यान, कोटा स्थानकावर त्रकारांनी गायकवाडांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र गायकवाडांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. यावेळी रवींद्र गायकवाडांची पत्रकारांसोबत बाचाबाची झाल्याचेही वृत्त आहे. त्यामुळे आपल्या संकटांमध्ये आणखी भर पडेल, याचा अंदाज आल्याने रवींद्र गायकवाड यांनी आपल्या खासगी वाहनाने प्रवास करण्याचा निर्णय घेतल्याचा अंदाज आहे.

तत्पूर्वी शुक्रवारी एअर इंडियासहित भारतीय विमान कंपन्यांच्या महासंघाने (फेडरेशन ऑफ इंडियन एअरलाइन्स : ‘एफआयए’) रवींद्र गायकवाड यांच्यावर हवाईप्रवास बंदी घालण्याचा निर्णय घेतला. तर दुसरीकडे दिल्ली पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध थेट सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याबद्दलचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याला तीन वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा आहे.

‘आम्ही खासदार गायकवाड यांच्याविरुद्ध भारतीय दंडविधानातील कलम ३०८ (सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न : ‘कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउटिंग टू मर्डर’) आणि ३५५ (गुन्हेगारी हेतूने अप्रतिष्ठा) नुसार गुन्हा दाखल केला आणि सखोल चौकशीसाठी तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे (क्राइम ब्रँच) सोपविला आहे,’ अशी माहिती दिल्ली पोलिसाचे प्रवक्ते दीपेंद्र पाठक यांनी रात्री पत्रकार परिषदेमध्ये दिली.