गेल्या काही दिवसांपासून भारत चीन सीमेवर तणावाचे वातावरण आहे. तर दुसरीकडे यावर देशात राजकारणही सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपप्रत्यारोपांच्या फैरी रंगत आहेत. यावरून आता शिवसेनेनं पुन्हा एकदा भाजपाला टोला लगावला आहे. संकट कितीही मोठे असले तरी भारताचे संस्कार हे निःस्वार्थ भावाने सेवा करण्याची प्रेरणा देतात असे मोदी सांगतात. तेव्हा त्यांच्या भक्तांनी विरोधकांकडे डोळे वटारून पाहण्याची गरज नाही, असे शिवसेनेने म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोदी चीनविषयी बोलतात व त्यांचे लोक विरोधकांकडे वाकड्या नजरेने पाहतात. कुछ तो गडबड है! करोनाप्रमाणे ‘ट्यून’ येथेही बदलायलाच हवी, असे म्हणच शिवसेनेनं सत्ताधाऱ्यांना टोला लगावला आहे. शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून सत्ताधाऱ्यांवर निशाण साधला.

काय म्हटलंय अग्रलेखात ?

‘करोना व्हायरसशी आज संपूर्ण देश लढत आहे. पण लक्षात ठेवा, आपल्याला रोगाशी लढायचे आहे, रोग्याशी नाही!’ जसा या ट्यूनचा लोकांना कंटाळा आला आहे तसा चीनप्रकरणी भाजप आणि काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या ट्यून युद्धाचाही कंटाळा आला आहे. ‘आपल्याला चीनशी लढायचे आहे, सरकारच्या विरोधकांशी नाही’ अशी एक कॉलर ट्यून कोणीतरी दिल्लीत सतत वाजवायला हवी. सीमेवरील गलवान खोर्‍यात चीनची घुसखोरी, बेकायदा बांधकामे सुरूच आहेत. त्यांना सडेतोड उत्तर देण्याऐवजी सरकार पक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी काँग्रेस पक्षालाच सडेतोड उत्तरे देत बसला आहे. राजीव गांधी फाऊंडेशनला चीनकडून निधी मिळाला. चीन व काँग्रेसचे नाते काय? असे प्रश्न भाजपकडून विचारण्यात आले. यावर काँग्रेसने प्रतिटोले मारले.

पंतप्रधान केअर्स फंडला चिनी कंपन्यांकडून शेकडो कोटी रुपये आले आहेत व सध्याचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्या मुलाच्या खात्यातही चिनी कंपन्यांकडून पैसे जमा झाल्याचा आरोप काँग्रेसने केला. म्हणजे आम्ही म्हणतोय तो मुद्दा हाच आहे. चीन सीमेवर चौक्या आणि बंकर्स उभे करीत आहे आणि देशात भाजप विरुद्ध काँग्रेस असे युद्ध रोज सुरू आहे.

चीन सीमेवर चौक्या आणि बंकर्स उभे करीत आहे आणि देशात भाजप विरुद्ध काँग्रेस असे युद्ध रोज सुरू आहे. आपल्याला चीनशी लढायचे आहे हे बहुतेक सगळेच विसरलेले दिसतात. या सगळ्या युद्धात शरद पवार यांनी एक काडी टाकली आहे ती अशी की, ‘देशाची सुरक्षा, राष्ट्रीय सुरक्षा वगैरे विषयांत कोणी राजकारण करू नये. हे बरे नाही.’ पवार यांनी हा टोला काँग्रेस किंवा राहुल गांधी यांनाच लगावला असे भाजपपुरस्कृत समाज माध्यमांवर पसरवले जात आहे. चिनी घुसखोरीचे राजकारण करू नये, हे पवारांचे म्हणणे बरोबर! पवारांचा हा टोला सरकार पक्षालाही लागू पडतो.

चीनप्रश्नी राजकारण कोणीच करू नये. पण असे राजकारण नक्की कोण करीत आहे? काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी चीनच्या घुसखोरीसंदर्भात विचारलेले प्रश्न म्हणजे पाण्यावरील बुडबुडे नाहीत. हेच प्रश्न कदाचित शरद पवार यांच्याही मनात घोळत असतील. चीनने आमच्या जमिनीवर घुसखोरी केली नाही, मग २० जवानांचे बलिदान का झाले? चीन आमच्या हद्दीत घुसला आहे काय? हे सर्व प्रश्न तर आहेतच. यावर पंतप्रधानांचे ठाम उत्तर असे आहे की, ‘‘भारताच्या भूमीकडे वाकड्या नजरेने पाहणार्‍यांना सडेतोड आणि ठोस उत्तर मिळाले आहे.’’
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत करोना आणि चीनविरुद्धच्या लढाया जिंकणार आहे,’ असे गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले. शहा यांना आमच्या शुभेच्छा आहेत. त्यांनी या दोन्ही लढायांवरच आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे. विरोधी पक्ष काय आदळआपट करीत आहे त्याकडे लक्ष देऊ नये. त्यांनी रोगाशी लढावे. रोग्यांशी लढून देशाचा वेळ आणि पैसा वाया घालवू नये.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena saamna editorial criticize pm narendra modi bjp government politics on india china border tension jud
First published on: 30-06-2020 at 07:35 IST