मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि प्रदेशाध्यक्ष कांतीलाल भुरिया यांना दहा कोटी रुपयांची बदनामी नोटीस पाठविली आहे. शिवराजसिंह चौहान यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून ही नोटीस पाठविण्यात आली आहे.
एका लोभी कुटुंबाने मध्य प्रदेशला लुटलंय, असे कॉंग्रेसने केलेल्या एका जाहिरातीमध्ये म्हटले आहे. याच जाहिरातीवरून चौहान यांनी सोनिया गांधी आणि कांतीलाल भुरिया यांना बदनामीची नोटीस पाठवली.
केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनीही चौहान सरकारवर हल्ला चढविला. चौहान केवळ पोकळ आश्वासने देत असल्याची टीका शिंदे यांनी केली. शूरवीरच केवळ आश्वासने देतात, असे चौहान म्हणत असले, तरी वीर कधीही पोकळ आश्वासने देत नाहीत, यावर माझा विश्वास असल्याचे शिंदे यांनी सांगितले. गेल्या दहा वर्षांतील भ्रष्टाचाराने मध्य प्रदेशातील भाजपच्या सरकारने राज्याला रसातळाला नेले असल्याची टीकाही शिंदे यांनी केली. भाजपचा जाहीरनामा म्हणजे खोटेपणाचा कळस असल्याचा आरोप त्यांनी केला.