लोकसभेत नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाच्या बाजूने मतदान केल्यानंतर आज राज्यसभेत विधेयकावरील मतदानावेळी शिवसेनेच्या खासदारांनी सभात्याग केला. काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेला राज्यसभेत विधेयकावर मतदान करण्याअगोदर सूचक इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने ही भूमिका घेतली असल्याचे दिसत आहे. विधेयकावरील चर्चेवेळी सभागृहात असलेल्या शिवसेनेच्या खासदारांनी मतदानावेळी मात्र सभात्याग केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेनेने लोकसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या बाजूने मतदान करताच काँग्रेसमध्ये त्याचे तीव्र पडसाद उमटले होते. या विधेयकाला पाठिंबा देणारे देशाचा पाया उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली होती, तर राज्यातील काँग्रेस नेत्यांनी देखील शिवसेनेच्या भूमिकेबद्दल नापसंती व्यक्त केली होती. त्यानंतर ‘पक्षाने उपस्थित केलेल्या मुद्दय़ांवरील स्पष्टीकरणाशिवाय राज्यसभेत विधेयकाला पाठिंबा देणार नाही,’ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले होते.

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला शिवसेनेने सर्वात आधी विरोध दर्शवला होता. भाजपशी काडीमोड घेतल्याने शिवसेना विरोधात मतदान करेल किंवा तटस्थ राहील, अशी शक्यता होती. हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर शिवसेना तडजोड करणार नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या खासदारांनी व्यक्त केली. पण, शिवसेनेने विधेयकाला पाठिंबा दिल्याने काँग्रेसमध्ये त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली. नागरिकत्व विधेयकाला पाठिंबा देऊन शिवसेनेने महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचे उल्लंघन करून भाजपला अप्रत्यक्ष पाठिंबा दिल्याचा आरोप काँग्रेसचे माजी मंत्री नसीम खान यांनी केला. ‘सेनेने विरोधात मतदान करणे वा तटस्थ राहणे अपेक्षित होते. विधेयकाच्या बाजूने मतदान करून शिवसेनेने काँग्रेसची फसवणूक केली’, अशी टीका काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी केली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena members of rajya sabha walk out during voting msr
First published on: 11-12-2019 at 20:14 IST