१८ जुलै रोजी होणाऱ्या देशाच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी एनडीएने आदिवासी नेतृत्व म्हणून द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे. अशा परिस्थितीत मुर्मू यांना एनडीएमध्ये सामील असलेल्या पक्षांचा पाठिंबा मिळत आहे. तसेच आदिवासी चेहऱ्यामुळे इतर पक्षही साथ देत आहेत. त्याचवेळी शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटानेही द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

शिंदे गटाच्या या घोषणेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. या निवडणुकीत विरोधकांनी यशवंत सिन्हा यांना उमेदवारी दिली आहे. अशा परिस्थितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह महाराष्ट्रात सरकारमध्ये सहभागी असलेली उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यशवंत सिन्हा की द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देणार याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

मात्र, याआधी शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर करण्याची विनंती केली होती. त्यानंतर आता आणखी एका खासदाराने द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याबाबत भाष्य केले आहे. पालघरचे शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांनी द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची विनंती केली आहे.

खासदार राहुल शेवाळेही वेगळय़ा मार्गावर? द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी

“राजकीय दृष्ट्या काही असले तरी पहिल्यांदाच आदिवासी महिलेला राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी मिळालेली आहे. उद्धव ठाकरेंनी मन मोठे करुन त्यांना पाठिंबा द्यावा. त्यांना पाठिंबा दिल्यास संपूर्ण आदिवासी समाज उद्धव ठाकरेंचे स्वागत करेल. मला विश्वास आहे की ते याबाबत निर्णय घेतील,” असे राजेंद्र गावित यांनी म्हटले.

याआधी शिवसेनेचे लोकसभा खासदार राहुल शेवाळे यांनी मंगळवारी रात्री उद्धव यांना पत्र लिहून मुर्मू यांना पाठिंबा देण्याची विनंती केली. पत्रात त्यांनी उद्धव यांना पक्षाच्या खासदारांना मुर्मू यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. ज्याप्रमाणे बाळासाहेब ठाकरेंनी प्रतिभा पाटील आणि प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिला होता, त्याप्रमाणे राजकीय मतभेदांव्यतिरिक्त द्रौपदी मुर्मू यांना पक्षाच्या खासदार म्हणून मत द्या, असे राहुल शेवाळे यांनी म्हटले आहे.

राहुल शेवाळेंची भूमिका योग्य – एकनाथ शिंदे</strong>

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमदेवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यासंबंधी खासदार राहुल शेवाळे यांनी घेतलेली भूमिका योग्यच असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. तसेच आम्ही शिवसेना अद्याप सोडलेली नसून आम्ही शिवसेनेतच असल्याचा पुर्नउच्चार करत पक्षातून आणखी कितीजणांना पदावरून हटवणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

“आदिवासी समाजातील महिला पहिल्यांदाच राष्ट्रपती होणार असून ही देशाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची गोष्ट आहे. आदिवासी समाजाने मुख्य प्रवाहात यावे यासाठी विविध योजना राबविण्यात येतात. परंतु या समाजातील द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी देण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा निर्णय घेतला असून हा त्या समाजाचा मोठा बहुमान आहे. त्यामुळे शेवाळे यांनी भूमिका योग्यच आहे,” असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.