मणिपूरमध्ये गेल्या दीड वर्षांपासून जातीय संघर्ष सुरू असून गेल्या काही दिवसांत हिंसाचाराच्या घटनांमध्येही मोठी वाढ झाली आहे. ड्रोन, अत्याधुनिक क्षेपणास्त्रे आदी वापरून हल्ले करण्यात येत आहेत. त्यामुळे राज्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या घटनांनंतर आता राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. दरम्यान, यावरून आता ठाकरे गटानेही केंद्रातील मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. मोदी सरकारला मणिपूरपेक्षा रशिया युक्रेन युद्धाची चिंता आहे. त्यांच्याकडे मणिपूरच्या प्रश्नांवर लक्ष देण्यासाठी वेळ नाही, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे. ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना”तून ही टीका करण्यात आली आहे.

ठाकरे गटाने नेमकं काय म्हटलंय?

“केंद्रातील मोदी सरकार रशिया-युक्रेन युद्ध थांबविण्याच्या ‘दिवास्वप्ना’त मश्गूल आहे आणि इकडे मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचाराचा वणवा पेटला आहे. मागील दीड वर्षापासून म्यानमार सीमेवरील हे राज्य जातीय-वांशिक हिंसाचारात होरपळते आहे. आतापर्यंत या वणव्यात २०० पेक्षा जास्त लोकांचा जीव गेला आहे. भाजपाचे पुचकामी मुख्यमंत्री बीरेन सिंह आणि मणिपूर सोडून आसामला पळून जाणारे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांच्या ‘हवाली’ मणिपूरमधील जनतेला केंद्र सरकारने ढकलून दिले आहे. त्याची जबाबदारी आणि उत्तरदायित्व पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना झटकता येणार नाही. पुनःपुन्हा हिंसाचाराच्या वणव्यात होरपळणारे मणिपूर हे केंद्रातील मोदी सरकारच्या बेपर्वाईचेच पाप आहे”, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाने दिली आहे.

हेही वाचा – Pankaja Munde: “राहुल गांधींबाबत मनोज जरांगे पाटील…”, पंकजा मुंडेंचं टीकास्र; ‘या’ विधानावरून केलं लक्ष्य!

“मोदी सरकारला मणिपूरपेक्षा रशिया युक्रेन युद्धाची काळजी…”

“मणिपुरातील हिंसाचारग्रस्त भागाची जातीनुसार विभागणी झाली आहे. हे सगळेच भयंकर आहे. तरीही आपल्या पंतप्रधानांना मणिपूरपेक्षा रशिया-युक्रेन युद्धाची ‘काळजी’ लागून राहिली आहे. मणिपूरबाबत मात्र ते ‘निष्काळजी’ आहेत. रशिया-युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी मोदी सरकारने रशियाला ‘फोन पॉइंट फॉर्म्युला’ दिला आहे, पण मग मणिपूरचे काय? मणिपूरमधील शांततेचा कुठलाच ‘फॉर्म्युला’ तुमच्याकडे नाही का? आधी मणिपूरची आग विझवा आणि मग रशिया-युक्रेनमध्ये तुमच्या त्या फॉर्म्युल्याचे ‘बंब’ घेऊन जा”, अशी टीकाही ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.

हेही वाचा – “फडणवीसांनी मुलीची शपथ घेऊन मला आश्वासन दिलेलं की…”, एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मणिपूरमधील जनतेची भेट घ्यायला मोदींकडे वेळ नाही”

“आपल्या देशातील एका राज्याला हिंसाचाराच्या ज्वालामुखीवर उभे करून ठेवायचे, त्या ज्वालामुखीचे स्फोट होऊ द्यायचे, त्यात तेथील जनतेला होरपळू द्यायचे आणि रशिया-युक्रेन युद्धासाठी शांततेची कबुतरे उडवायची. तेथील युद्धबंदीच्या वल्गना करायच्या आणि मणिपूरमधील हिंसाचारावर ‘ब्र’देखील काढायचा नाही. मोदी यांना पुतिन आणि झेलेन्स्की यांच्या गळाभेटी घ्यायला वेळ आहे, पण दीड वर्षापासून जातीय वणव्यात होरपळणाऱ्या मणिपूरमधील सामान्य जनतेची भेट घ्यायला मात्र त्यांना फुरसत नाही. युद्धभूमी बनलेल्या युक्रेनमध्ये मोदी रेल्वेने १६ तास प्रवास करतात, परंतु मणिपूरमधील हिंसाचारग्रस्त भागाचा छोटा दौरा करायलाही त्यांना अद्याप सवड मिळालेली नाही”, असंही ठाकरे गटाने म्हटलं आहे.