केंद्रात आणि राज्यात सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने भाजपवर निशाणा साधत उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. याशिवाय गोव्यातही शिवसेना निवडणूक लढणार आहे. उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या किमान १५० जागांवर शिवसेना निवडणूक लढणार आहे, असे शिवसेनेने सांगितले. शिवसेनेच्या या निर्णयामुळे उत्तर प्रदेश जिंकण्याचा निर्धार केलेल्या भाजपची मात्र, कोंडी होणार आहे, असे बोलले जाते.

केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये सत्तेत सहभागी असूनही शिवसेना आणि भाजपत नेहमीच ‘खटके’ उडत आहेत. प्रत्येक मुद्द्यावर भाजपची कोंडी करणाऱ्या शिवसेनेने पुन्हा एकदा उत्तर प्रदेश आणि गोव्यातील निवडणुकांमध्ये कोंडी करण्याची योजना आखली आहे, असे दिसते. उत्तर प्रदेशमध्ये शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे शिवसेनेने जाहीर केले आहे. तर गोव्यात गोवा सुरक्षा मंचासोबत युती केली असून, तिथेही शिवसेनेचे उमेदवार काही जागांवर लढतील. उत्तर प्रदेश, गोवासह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा आज, बुधवारी जाहीर करण्यात आल्या. त्यानंतर शिवसेनेनेही उत्तर प्रदेशात स्वबळावर लढण्याचा नारा दिला. शिवसेना उत्तर प्रदेशात किमान १५० जागा लढवेल, अशी घोषणा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली. गोव्यातील निवडणुकांसाठी यापूर्वीच गोवा सुरक्षा मंचासोबत बोलणी झाली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, यापूर्वी शिवसेनेने बिहार विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढली होती. त्यात शिवसेनेला अनेक ठिकाणी चांगली मते मिळाली होती. शिवसेनेला मिळालेल्या मतांमुळे भाजपला मोठा फटका त्यावेळी बसला होता. आता पुन्हा उत्तर प्रदेशात शिवसेनेने स्वबळाचा नारा दिल्याने उत्तर प्रदेश जिंकण्याचा निर्धार करणाऱ्या भाजपला मोठा धक्का आहे, असे मानले जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.