A 7-month-old girl disappeared mysteriously: लुधियानाच्या न्यू करतार नगर भागात बुधवारी रात्री सात महिन्यांची चिमुकली रहस्यमय स्थितीत आपल्या घरातून नाहीशी झाली होती. अखेर १५ तासांच्या शोधानंतर ती घराजवळील एका मोकळ्या जागेत सापडली, अशी माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली.

कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात नेले. पोलिसांनी या घटनेत काहीतरी संशयास्पद असल्याचे म्हटले असून, कुटुंबातील ओळखीच्या कोणाचा तरी यात हात असण्याची शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली. या चिमुकलीला दोन मोठ्या बहिणी असून ती सर्वांत लहान आहे.

कुटुंबीयांनी सांगितले की, “चिमुकली आपल्या आई आणि दोन मोठ्या बहिणींबरोबर झोपलेली होती. पहाटे ३:३० वाजता मोठ्या बहिणींपैकी एकजण पलंगावरून खाली पडली आणि रडायला लागली. त्यामुळे आईला जाग आली आणि तिला लक्षात आले की, सर्वांत लहान मुलगी बेपत्ता आहे. खोलीचं दार उघडं होतं आणि लाईटही सुरू होता.” त्यानंतर कुटुंबीयांनी शोध घेण्यास सुरुवात केली.

चिमुकलीचे वडील गुरप्रीत सिंग, हे हॉटेल व्यावसायिक आहेत. ही घटना घडली तेव्हा ते शहराबाहेर होते. “माझ्या पत्नीने सकाळी ४ वाजता मला फोन केला. ती घाबरलेली होती. तिने आपली सर्वांत लहान मुलगी बेपत्ता आहे असं सांगितलं. आमच्याकडे मानसिक रुग्ण असलेला एक नातेवाईक वरच्या मजल्यावर राहतो, त्यामुळे टेरेसचं दार नेहमी लॉक ठेवतो, पण त्या रात्री ते चुकून उघडं राहिलं,” असं गुरप्रीतने सांगितलं. तक्रारीनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं. त्यामध्ये तीन अनोळखी व्यक्ती घराजवळ बादल्या घेऊन फिरताना दिसले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मॉडेल टाउन पोलिस ठाण्याचे एसएचओ इन्स्पेक्टर बलविंदर सिंग म्हणाले, “आम्ही सर्व शक्यता तपासत आहोत. शेजाऱ्यांचा सहभाग असण्याची किंवा प्राण्याने मुलीला उचलून नेण्याचीही शक्यता तपासली जात आहे. सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून कुटुंबातील लोकांच्या कॉल डिटेल्सचीही तपासणी केली जात आहे.”