इयत्ता सातवीत शिकणाऱ्या एका १४ वर्षीय मुलीने बलात्काराचा प्रयत्न हाणून पाडल्याने दोन विद्यार्थ्यांनी तिला पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार छत्तीसगडमध्ये घडला आहे. यामध्ये पीडित मुलगी ८० टक्के भाजल्याने उपचारांदरम्यान तिचा बुधवारी मृत्यू झाला. आरोपी पीडित विद्यार्थ्यीनीच्या शाळेतीलच वरच्या वर्गातील विद्यार्थी आहेत. यातील एक अल्पवयीन आहे.

छत्तीसगडमधील बेमेतारा जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. मृत्यूपूर्वी पीडित विद्यार्थीनीने गावातील दोन तरुणांनी तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. रायपूर पोलिसांनी याप्रकरणी झिरो एफआयआर दाखल केली आहे. टाइम्स नाऊने याबाबत वृत्त दिलं आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, २२ जून २०२० रोजी ही घटना घडली. या दिवशी पीडित मुलगी तिच्या घरापासून जवळच असलेल्या शेतात काम करीत होती. यावेळी या मुलीच्या घरी कोणीच नव्हते. यावेळी आरोपी या मुलीला जबरदस्तीने तिच्या घरात घेऊन गेले आणि त्याच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी मुलीने त्यांना जोरदार विरोध केला. धक्कादायक बाब म्हणजे मुलीने बलात्काराचा प्रयत्न हाणून पाडल्याने त्या मुलांनी तिला पेटवून दिले.

य़ा घटनेनंतर शरद जैसवाल नावाचा एक सज्ञान आरोपी दुसऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलासह घटनास्थळावरुन पळून गेला. ही घटना त्यावेळी लक्षात आली ज्यावेळी पीडित मुलीचे कुटुंबीय घरी परतले आणि त्यांना आपली मुलगी कुठेच दिसली नाही. त्यामुळे त्यांनी तिला शोधायला सुरुवात केली तेव्हा ती शेतात जळालेल्या स्थितीत बेशुद्धावस्थेत पडलेली आढळून आली. यामध्ये ती ८० टक्के भाजली होती.

हा धक्कादायक प्रकार पहिल्यानंतर पीडित मुलीच्या घरच्यांनी तिला तातडीने रायपूर येथील रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, तिच्यावर उपचार सुरु असतानाच पोलिसांनी तिचा जबाब नोंदवून घेतला, त्यानंतर तिने काही वेळातच शेवटचा श्वास घेतला. पीडित मुलीच्या जबाबानुसार पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर बालअत्याचार प्रतिबंध कायदा (पोक्सो) आणि भादंवि कलमांर्गत गुन्हा दाखल केला आहे.