अमेरिकेतील एमआयटी म्हणजे मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतील वैज्ञानिकांनी नवीन क्वांटम संगणक संकल्पना शोधली असून ती शोरच्या अलगॉरिथमचा प्रत्यक्ष वापर करून साकारली आहे. अर्थात अशा प्रकारचा संगणक तयार करण्याचा दावा करण्यात आला असला तरी त्याचा नेहमीच्या पातळीवर वापर करण्यासाठी मोठा खर्च येणार आहे. या पद्धतीमुळे संगणकातील आताची माहिती संकेतांकन म्हणजे एनक्रिप्शन पद्धती कालबाहय़ ठरणार असून ही माहिती उघड करणे सोपे जाणार आहे. नवीन तंत्रज्ञानात माहिती अवस्थांच्या ३१२५ शक्यता दाखवण्यात आल्या आहेत. २००९ मध्ये संगणकातील एनक्रिप्शन अवघड असल्याची बाब सामोरी आली होती, कारण २३२ या संख्येचे मूळ अवयव काढण्यासाठी अनेक संगणक वापरावे लागले होते. आता क्वांटम संगणकाने हे काम अगदी कमी काळात केले आहे. संशोधकांनी म्हटले आहे की, पाच अणूंच्या मदतीने त्यांनी क्वांटम संगणक तयार करण्याची नवीन पद्धत शोधली असून गेल्या वीस वर्षांपूर्वीच्या एका गणिती तंत्राचा वापर त्यात केला आहे. अशा प्रकारे त्या तंत्राचा वापर करून संगणकातील माहिती सुरक्षित ठेवण्याची ही पहिलीच वेळ आहे. लेसर स्पंदनांच्या मदतीने त्यांनी शोर अलगॉरिथमचा वापर प्रत्यक्ष संगणकात केला आहे. त्यामुळे पंधरा या आकडय़ाचे मूळ अवयव काढले आहेत ते पाच आणि तीन येतात. वैज्ञानिकांच्या मते हीच पद्धत वापरून मोठय़ा संख्यांचे अवयवही काढता येतात. एमआयटीचे आयझॅक शुआंग यांनी सांगितले की, शोरचा अलगॉरिथम हा क्वांटम अलगॉरिथम अत्यंत अवघड मानला जातो. पण तो प्रत्यक्षात दाखवण्यासाठी तुम्हाला प्रयोगशाळेत जाऊन तंत्रज्ञान वापरावे लागते. त्यातून मोठा क्वांटम संगणक तयार करता येतो. जटिल आकडेमोड त्याच्या मदतीने करता येते. डिजिटल संगणक हे ० व १ या आकडय़ांवर अवलंबून असतात व त्यांच्या मदतीने संगणकातील आकडेमोड चालते. क्वांटम म्हणजे पूंज भौतिकीवर आधारित संगणकात क्विबिटचा वापर केला जातो. त्यात ० व १ हे आकडे एकाच ठिकाणी अधिरचित केले जातात.
क्वांटम संगणकात सध्याच्या तंत्रज्ञानामुळे एकच गणन हे एकाच वेळी करता येते त्यामुळे वेग व कार्यक्षमता वाढते. पंधराचे अवयव काढण्यासाठी अनेक क्विबिट्स लागतात पण नव्या तंत्राने ते निम्म्या क्युबिटमध्येच काढणे शक्य होते असे एमआयटीच्या वैज्ञानिकांनी म्हटले आहे. आयझंक शुआंग हे भौतिकशास्त्र, संगणक विज्ञान व अभियांत्रिकीचे प्राध्यापक आहेत. त्यांनी सांगितले की, एमआयटीतील संशोधन निबंधानुसार त्यांनी शोरचा अलगॉरिथम प्रत्यक्ष वापरात आणला आहे. यात तुम्हाला प्रयोगशाळेत जाऊन प्रयोग करावे लागतात व जास्त तंत्रज्ञानाचे ज्ञान असणे गरजेचे आहे. तसे केले तर मोठय़ा आकडेमोडी किंवा जटिल समस्या सोडवणारा क्वांटम संगणक तयार करणे शक्य आहे.
संग्रहित लेख, दिनांक 11th Mar 2016 रोजी प्रकाशित
शोरच्या अलगॉरिथमचा प्रत्यक्ष संगणकात वापर यशस्वी
क्वांटम संगणक संकल्पना शोधली असून ती शोरच्या अलगॉरिथमचा प्रत्यक्ष वापर करून साकारली आहे.

First published on: 11-03-2016 at 02:12 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shors algorithm used in computer