Shubhanshu Shukla ISRO Mission Cost and Details : अ‍ॅक्सिओम-४ या अंतराळ मोहिमेंतर्गत भारताचे अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्यासह आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात गेलेले चार अंतराळवीर मंगळवारी (१५ जुलै) सुखरूप पृथ्वीवर परतले. अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील सॅन दिएगोच्या किनाऱ्यावर त्यांनी स्प्लॅशडाउन लॅन्डिंग केलं. शुक्ला हे राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळात गेलेले दुसरे भारतीय अंतराळवीर ठरले आहेत. भविष्यातील भारताच्या ‘गगनयान’ मोहिमांच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे.

आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात १८ दिवस राहिल्यानंतर शुभांशू शुक्ला हे ‘ड्रॅगन’ या स्पेस कॅप्स्यूलद्वारे (अवकाशकुपी) कॅलिफोर्नियाजवळ प्रशांत महासागरात उतरले. त्यांच्याबरोबर अमेरिकेचे पेगी व्हाइटसन (मोहिमेचे नेतृत्व), स्लावोझ उइनान्स्की (पोलंड) आणि टिबर कापू (हंगेरी) हे देखील या मोहिमेवर गेले होते. भारतीय वेळेनुसार दुपारी ३.०१ वाजता त्यांचं अवकाशयान पृथ्वीवर उतरलं. सोमवारी सायंकाळी ४.४५ च्या सुमारास त्यांनी परतीचा प्रवास सुरू केला होता. शुक्ला यांनी पृथ्वीवर पाऊल ठेवल्यानंतर संपूर्ण देशाने एकच जल्लोष केला.

अ‍ॅक्सिओम मोहीम भारताच्या गगनयान अभियानाची पूर्वतयारी

अ‍ॅक्सिओम ही मोहीम भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो), अमेरिकेची अंतराळ संस्था नासा, खासगी कंपनी अ‍ॅक्सओम स्पेस व उद्योगपती एलॉन मस्क यांच्या मालकीची खासगी अंतराळ संशोधन कंपनी स्पेसएक्सच्या संयुक्त प्रयत्नातून राबवण्यात आली आहे. खूप कमी लोकांना माहिती असेल की या मोहिमेवर इस्रोने देखील मोठा खर्च केला आहे. भारताने मानवाला अंतराळात पाठवण्याची योजना आखली आहे. अ‍ॅक्सिओम मोहीम त्या योजनेचा सुरुवातीचा टप्पा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अ‍ॅक्सिओम मोहिमेत इस्रोचंही योगदान

डीएनएच्या अहवालानुसार अ‍ॅक्सिओम मोहीमेवर झालेल्या खर्चापैकी ५५० कोटी रुपयांचा भार इस्रोने उचलला आहे. याबाबत इस्रोने म्हटलं आहे की “शुक्ला यांचा अंतराळ प्रवास हा भारताच्या स्वतःच्या मानवी अंतराळ मोहिमेच्या दिशेने उचललेलं पहिलं आणि महत्त्वाचं पाऊल आहे. भारताच्या गगनयान मोहिमेची ही तयारी आहे.” भारत २०२७ मध्ये गगनयान मोहिमा राबवणार आहे. या कार्यक्रमासाठी इस्रोने भारतीय हवाई दलातील चार अधिकाऱ्यांची (पायलट्स) निवड केली आहे. शुक्ला हे त्यांच्यापैकीच एक आहेत. भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर राकेश शर्मा यांनी ४० वर्षांपूर्वी गगनभरारी घेतली होती. त्यानंतर आता शुभांशू शुक्ला यांनी अंतराळात भारताचा ध्वज उंचावला आहे. अ‍ॅक्सिओम या मोहिमेच्या निमित्ताने पहिल्यांदाच एका भारतीयाने आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाला भेट दिली आहे.