मंगळवारी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ४५ वर्षांवरील सहव्याधी असणारे आणि नसणारे अशा सर्वांना करोनाची लस घेता येईल अशी घोषणा केली. त्यामुळे या वयोगटातल्या नागरिकांना लसीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे लशींच्या डोसची मागणी वाढण्याची शक्यता आहे. मात्र, दुसरीकडे सिरम इन्स्टिट्युटनं केंद्र सरकारकडे ब्रिटनला कोविशिल्ड लशींचे ५० लाख डोस ब्रिटनला देण्याची परवानगी मागितली आहे. यामुळे देशांतर्गत सध्या सुरू असलेल्या डोसच्या पुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही, अशी खात्री सिरमनं केंद्र सरकारला दिली आहे. तसेच, अ‍ॅस्ट्राझेन्कासोबत झालेल्या करारानुसारच हे डोस ब्रिटनला द्यायचे आहेत, असं देखील सिरमकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ब्रिटनसोबत १० कोटी डोसचा करार!

ब्रिटनमध्ये फायझर आणि कोविशिल्ड या दोन लशींच्या लसीकरणाला परवानगी देण्यात आली आहे. क्विंटने बीबीसीच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार सिरम इन्स्टिट्युटकडून लसीचे डोस पुरवण्यात झालेल्या उशिरामुळे ब्रिटनमधला लसीकरणाचा कार्यक्रम एप्रिल महिन्यात सुरू होणार आहे. ब्रिटनने अ‍ॅस्ट्राझेन्कासोबत एकूण १० कोटी लसीच्या डोससाठी करार केला आहे. त्यापैकी १ कोटी डोस हे सिरमकडून येणे अपेक्षित आहे. त्यापैकी ५० लाख डोस आत्ता पुरवण्याची परवानगी सिरमने मागितली आहे. ऑक्सफोर्ड, अ‍ॅस्ट्राझेन्का आणि सिरम यांनी संयुक्तपणे कोविशिल्ड लस विकसित केली असून लसीचं बहुतांश उत्पादन हे पुण्यातील सिरमच्या प्लांटमध्ये सुरू आहे.

४५ वर्षांपुढील सर्वांना लस!

…तर ब्रिटनमधल्या लसीकरणाला ब्रेक

दरम्यान, सिरमचे सीईओ अदर पुनावाला यानी टेलिग्राफशी बोलताना हे स्पष्ट केलं आहे की ब्रिटनला केला जाणारा लशींचा पुरवठा हा पूर्णपणे केंद्र सरकारच्या परवानगीवर अवलंबून असणार आहे. सरकारने परवानगी दिली, तर डोसचा पुरवठा केला जाईल. या तिन्ही कंपन्यांमध्ये झालेल्या करारानुसार अ‍ॅस्ट्राझेन्काने ज्या देशांसोबत लस पुरवठ्याचे करार केले आहेत, त्या देशांना सिरमकडून लस पुरवठा केला जाणार आहे. जर ब्रिटनला ही ५० लाख डोसची बॅच पाठवली गेली नाही, तर त्यांना लसीकरण थांबवावं लागेल, अशी परिस्थितीत असल्याची माहिती सिरममधील डीजीआरए प्रकाश कुमार सिंग यांनी दिली आहे. त्यामुळे आता यावर केंद्र सरकारकडून काय निर्णय घेतला जातो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sii asks govt for permission to supply covishield vaccine to britain uk pmw
First published on: 24-03-2021 at 16:03 IST