देशाने करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत १०० कोटींचा मोठा टप्पा पार केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी देशातल्या लस उत्पादकांशी चर्चा केली. या चर्चेनंतर सीरम इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापकीय संचालक सायरस पूनावाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं आहे. पूनावाला म्हणाले की, भारताने १ अब्ज लसीकरणाचा टप्पा गाठला तो पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रयत्नांमुळेच.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यांनी एएनआयला सांगितले की, “पंतप्रधानांनी प्रवाहाविरुद्ध जाऊन सगळ्यांना वेगाने हालचाल करायला लावली. ते नसते आणि फक्त आरोग्य मंत्रालयाकडे नियंत्रण असतं तर आज भारत एक अब्ज डोस तयार करू शकला नसता.”

“माझ्या मनात त्याबद्दल कोणतीही शंका नाही. नोव्हेंबरमध्ये जेव्हा ते पुण्यात आले तेव्हा मी त्यांना आश्वासन दिले होते आणि आज भारताला कोविड लसींबद्दल स्वयंपूर्ण बनवण्याचे आमचे आश्वासन पूर्ण झाल्याबद्दल त्यांना आनंद झाला. जगातील सर्वात कमी संभाव्य किमतीत भारतात लस उपलब्ध आहे. पंतप्रधान नियामक परवानग्या मिळविण्यासाठी प्रवाहाविरुद्ध गेले आणि आज भारत एवढ्या मोठ्या लोकसंख्येला लसीकृत करू शकला आहे”, सायरस पूनावाला पुढे म्हणाले.

सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ), अदर पूनावाला यांनी देश आणि लस उत्पादकांना महत्त्वपूर्ण संख्या गाठण्यास मदत केल्याबद्दल भारत सरकारचे आभार मानले. “सरकारसोबत आम्ही काम केले आहे आणि याच कारणामुळे आम्ही हे लक्ष्य साध्य करु शकलो. आम्ही भविष्यातील योजना आणि संबंधित धोरणे कशी वाढवू शकतो यावर पंतप्रधान मोदींशी चर्चा केली. भारताने लस निर्यात आणि उत्पादनात पुढे राहणे आवश्यक आहे”, अदर पूनावाला म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Siis cyrus adar poonawalla laud pm modi for accelerating nations vaccination drive vsk
First published on: 24-10-2021 at 08:10 IST