विविध क्षेत्रांतील मान्यवरांना त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा सन्मान म्हणून केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱया पद्म पुरस्कारांची यादी समोर आली आहे. पद्म पुरस्कारांसाठी यंदा गायक कैलाश खेर, गायिका अनुराधा पौडवाल, शेफ संजीव कपूर, क्रिकेटपटू विराट कोहली, जिम्नॅस्ट दीपा कर्माकर आणि कुस्तीपटू साक्षी मलिक यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पद्म पुरस्कारांच्या निवडीसाठी यावेळी वेगळी पद्धतीचा अवलंब करण्यात आला होता. केंद्र सरकारने मागील वर्षी मे महिन्यात ऑनलाईन पद्धतीने पद्म पुरस्कारांसाठीचे कौल मागवले होते. यात मिळालेल्या तब्बल ५,००० प्रवेशिकांमधून डिसेंबर महिन्यात ५०० नावं अंतिम यादीत समाविष्ट करण्यात आली. क्रीडा, मनोरंजन, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात आपल्या लक्षवेधी कामगिरीने वेगळी ओळख निर्माण करून देशाचे नाव उंचावणाऱया मान्यवरांचा पद्म पुरस्काराने सन्मान करण्यात येतो. कैलाश खेर, अनुराधा पौडवाल, संजीव कपूर, विराट कोहली, दीपा कर्माकर, साक्षी मलिक यांच्यासोबतच पॅरालिम्पिकपटू मरियप्पन थांगवेलू यालाही पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

वाचा: कोहली, साक्षी मलिक, दीपा कर्माकर यांना पद्मश्री

 

सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱयांचाही गौरव करण्यात येणार आहे. झारखंडच्या आदिवासी विभागात रुग्णांची सेवा केलेल्या डॉ. मुकूट मिंझ यांनाही नागरी सन्मानाने गौरविण्यात येईल. तर बिहारमधील मधुबनी चित्रकार बाओआ देवी, मल्ल्याळम कवी अक्कीथम नांबूथिरी, ओडिशाचे अभिनेते साधू मेहेर आणि माजी कायदे सचिव टी.के.विश्वनाथन यांचाही पद्मश्री पुरस्कारांच्या यादीत समावेश आहे. यंदा एकूण १२० मान्यवरांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.