पश्चिम आफ्रिकेतून भारतीय लोकांनी काढता पाय घेतला असून इबोलाग्रस्त लायबेरिया व आसपासच्या प्रदेशातील किमान सहा लोक दिल्ली विमानतळावर आले; त्यांच्या चाचण्या करून त्यांना वेगळे ठेवण्यात आले. मुंबईत इतर ९८ जण आले असून त्यांच्या चाचण्या केल्या असता ते लक्षणांपासून मुक्त दिसून आले. दिल्लीत आलेल्या लोकांमध्ये दोन महिला व एका मुलास एका रूग्णालयात नेले असून त्यांच्यातील लक्षणांवर बारकाईने लक्ष दिले जात आहे,
९८ प्रवासी इबोला संसर्गमुक्त
मुंबई: इबोलाचा उद्रेक झालेल्या पश्चिम आफ्रिकेतील लायबेरिया आणि नायजेरिया देशांमधून मुंबई विमानतळावर मंगळवारी उतरलेल्या ९८ प्रवाशांपैकी एकालाही इबोलाची लक्षणे दिसत नसल्याचे महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. इबोलाचा संसर्ग हवेतून होत नसल्याने याबाबत चिंतेचे कारण नसल्याचे राज्य आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.
लायबेरियातील मेसर्स अ‍ॅफकॉन कंपनीच्या विनंतीनुसार त्यांच्याकडील ११४ भारतीय कामगारांना मायदेशी नेण्याची विनंती केल्यावर इंटरनॅशनल एसओएसकडून या कामगारांना मुंबई व दिल्लीमध्ये आणण्याची प्रक्रिया सुरू झाली.
 यातील ६६ कर्मचारी मुंबईत तर १५ प्रवासी दिल्लीत उतरले. याशिवाय १९ प्रवासी नायजेरियावरून मुंबईत आले. लायबेरियातून आलेल्या ६६ पैकी पाच कर्मचारी मुंबई- ठाण्यातील आहेत.