stampede at Mansa Devi temple in Haridwar Update : हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांवर रविवारी सकाळी ही चेंगराचेंगरीची घटना घडली. या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यादरम्यान गढवाल डिव्हीजनचे आयुक्त विनय शंकर पांडे यांनी वृत्तसंस्था एएनआयला या घटनेबद्दल माहिती दिली आहे. तसेच ते सध्या मंदिराकडे जात असल्याचे सांगितले.
“हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात प्रचंड गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. मी घटनास्थळाकडे जात आहे. या घटनेच्या सविस्तर अहवालाची प्रतिक्षा आहे,” असे गढवाल डिव्हिजनचे आयुक्त विनय शंकर पांडे यांनी सांगितले.
Uttarakhand | 6 people dead in a stampede after a huge crowd gathered at the Mansa Devi temple in Haridwar. I am leaving for the spot. A detailed report of the incident is awaited: Garhwal Division Commissioner Vinay Shankar Pandey to ANI pic.twitter.com/nTLNf6DG9j
— ANI (@ANI) July 27, 2025
आयजी कायदा आणि सुव्यवस्था, निलेश भारणे यांनी सांगितले की, भाविक मंदिराकडे जात असताना ही घटना रविवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली. “तेथे विजेचा धोका असल्याबद्दल अफवा पसरली, त्यामुळे भाविकांमध्ये भीती पसरली आणि ही परिस्थिती उद्भवली. आम्ही कारणांचा तपास करत आहेत आणि बचावकार्य सुरू आहे,” असे त्यांनी सांगितले.
अनेक जखमी भाविकांना रुग्णालयात दाखल केले जात असल्याचे व्हिडीओ देखील समोर आले आहेत.
मनसा देवी मंदिर हे हरिद्वारच्या पाच पवित्र स्थळांपैकी एक मानले जाते पंच तीर्थांपैकी एक म्हणून येथे अनेक भाविक दर्शनासाठी येतात. हे मंदिर शिवालिक हिल्स येथे ५०० फूटांपेक्षा जास्त उंचीवर आहे.
मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दुःख
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी चेंगराचेंगरीनंतर सोशल मीडियावर केलेल्या पोस्टच्या माध्यमातून दुःख व्यक्त केले आणि परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचे म्हटले आहे. “हरिद्वार येथील मनसा देवी मंदिराच्या मार्गावर चेंगराचेंगरीच्या घटनेची दुःखद बातमी मिळाली आहे. SDRF, स्थानिक पोलिस आणि इतर बचाव पथके घटनास्छळी पोहचून बचाव कार्य करत आहेत. याबाबतीच मी सतत्याने स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहे आणि परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. माता राणीचे सर्व भाविक सुखरूप राहावेत यासाठी प्रार्थना करतो,” असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.