श्रीनगर : श्रीनगर शहराच्या बाहेर झेलम नदीत मंगळवारी नाव उलटून सहा जणांचा मृत्यू झाला. या नावेत बहुतांश शाळकरी मुले होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. गंडाबल नौगाम परिसरात सकाळी ८ वाजता ही घटना घडली असून आतापर्यंत सहा जणांना नदीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे झेलम नदी तसेच तलाव आणि जलाशयांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. नावेत किती लोक होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. श्रीनगरचे उपायुक्तांनी सांगितले की, या अपघातात प्राण गमावलेल्या

सहा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. आम्ही इतर सहा जणांना वाचवले असून त्यापैकी तिघांवर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. उर्वरित तीन जणांना त्यांच्या घरी पाठवण्यात आले आहे. बोटीत किती लोक होते याचा शोध घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा >>> विकासाचे गुलाबी चित्र रंगवण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेवर यूपीए सरकारचा दबाव! सुब्बाराव यांचा मुखर्जी, चिदम्बरम यांच्यावर आरोप

नावेत सात मुलांसह १५ लोक होते, असे सांगितले जाते. अधिकाऱ्यांनी सोमवारी एक अलर्ट जारी केला असून नदीच्या तटांजवळ राहणाऱ्या लोकांना पाणी पातळीत वाढ होत असल्याने सतर्क राहण्यास सांगितले आहे.

जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि इतर अनेक नेत्यांनी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. सिन्हा म्हणाले, ‘‘या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे अशा शोकग्रस्त कुटुंबांना प्रशासन सर्वतोपरी मदत करत आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत.’’ नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुक अब्दुल्ला, उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला तसेच पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनी शोक व्यक्त केला आहे.

निवडणूक प्रचार स्थगित नाव उलटून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जम्मू आणि काश्मीरमधील विविध राजकीय पक्षांनी मंगळवारी लोकसभा निवडणुकीचा प्रचार स्थगित केला आहे. श्रीनगर लोकसभा मतदारसंघातील नॅशनल कॉन्फरन्सचे उमेदवार आगा सय्यद रुहुल्ला मेहदी यांनी आपला प्रचार दोन दिवसांसाठी थांबवला आहे. जम्मू आणि काश्मीर पीपल्स कॉन्फरन्सनेही (जेकेपीसी) प्रचार थांबवला.