महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे याचा जन्मदिवस साजरा केल्याच्या आरोपावरून हिंदू महासभेच्या सहा कार्यकर्त्यांना सोमवारी अटक करण्यात आली.

सुरतच्या लिंबायत परिसरातील सूर्यमुखी हनुमान मंदिरामध्ये रविवारी नथुरामची जयंती साजरी करण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर या सहा जणांना अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.

हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी नथुरामच्या जन्मदिवसाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यानंतर त्यांना अटक केल्याचे सुरतचे पोलीस आयुक्त सतीश शर्मा यांनी सांगितले.

हिरेन मश्रू, वाला भारवाड, विरल मालवी, हितेश सोनार, योगेश पटेल आणि मनीष कलाल अशी अटक केलेल्या कार्यकर्त्यांची नावे आहेत.

या जयंती कार्यक्रमात गोडसेच्या छायाचित्राभोवती दिवे लावण्यात आले आणि मिठाईचे वाटप करून भजनेही म्हणण्यात आली. या कार्यक्रमाची ध्वनीचिफीत तयार करून छायाचित्रेही घेण्यात आल्याचे शर्मा यांनी सांगितले.

भाजपचे प्रवक्ते भारत पंडय़ा यांनी हिंदू महासभेचे हे कार्यकर्ते अपरिपक्व असून गांधीजींची शिकवण त्यांना समजणार नाही, अशी टीका केली. गुजरातचे गृहमंत्री प्रदीपसिंह जाडेजा यांनी नथुरामचे उदात्तीकरण खपवून घेणार नाही, असे सांगितले.