Six Terrorists Killed in Kashmir: ऑपरेशन सिंदूरनंतरही भारतीय लष्कराकडून दहशतवादाच्या विरोधात जोरदार कारवाई सुरू आहे. मागच्या ४८ तासांत सुरक्षा दलाने त्राल आणि शोपियानमध्ये राबविलेल्या दोन मोहिमांमध्ये सहा दहशतवादी मारले गेले आहेत. काश्मीर झोनचे पोलीस महानिरीक्षक व्हीके बिर्दी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन सुरक्षा दलाच्या कारवाईबाबतची माहिती दिली. सीआरपीएफ, भारतीय लष्कर आणि जम्मू आणि काश्मीर पोलीस यांनी संयुक्तपणे राबविलेल्या दहशतवादी विरोधी मोहिमेला मोठे यश आल्याचे बिर्दी यांनी सांगितले.

अवंतीपुरा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बिर्दी म्हणाले की, काश्मीरमधील दहशतवादाला चाप बसविण्यासाठी सुरक्षा दलाची समन्वय बैठक घेऊन सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. सीआरपीएफ, भारतीय लष्कर आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या सहकार्यातून मागच्या ४८ तासांत दोन ऑपरेशन्स राबविण्यात आली. ज्याला मोठे यश प्राप्त झाले आहे.

काश्मीरमधील दहशतवाद संपुष्टात आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शोपियान आणि त्राल येथील दोन ऑपरेशन्समध्ये सहा दहशतवादी ठार करण्यात यश आले आहे, असेही बिर्दी म्हणाले. सीआरपीएफचे पोलीस महानिरीक्षक मितेश यांनीही याच पत्रकार परिषदेत सुरक्षा दलाच्या कारवायांची माहिती दिली. ते म्हणाले, भविष्यातही तीनही सुरक्षा दलामध्ये असाच समन्वय राहिल, याची आम्ही खात्री देतो. एकमेकांच्या सहकार्यातून लवकरच काश्मीरमधून दहशतवादाचे उच्चाटन केले जाईल.

गुरुवारी सकाळी विशेष गुप्तचर माहितीच्या आधारे त्राल येथे दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्यात आली. चिनार कॉर्प्सच्या माहितीनुसार, या भागात संशयास्पद हालचाल दिसून आली होती. सुरक्षा दलाने हटकल्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. या गोळीबारात दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.

पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला. या तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलाकडून दहशतवादाच्या विरोधात कडक पाऊले उचलण्यात येत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान शोपियानमध्ये सुरक्षा दलाने लष्कर-ए-तय्यबाशी संबंधित संघटना टीआरएफचा कमांडर शाहीद कुट्टय आणि इतर दोघांना ठार केले. दुसऱ्या अतिरेक्याचे नाव अदनान शफी असून तिसऱ्या अतिरेक्याची ओळख अद्याप पटलेली नाही.