लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक मुलाखती दिल्या आहेत. या मुलाखतीत त्यांनी अनेक गौप्यस्फोट केले. आता एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्याबरोबर घडलेल्या वाईट घटनांवर भाष्य केलं आहे.
“ते नामदार आहेत. आपण कामदार आहोत. त्यामुळे आमच्या नशिबी शिवीगाळ आणि अपमान लिहिलेलाच आहे. कोणी मला शिवी दिली तरी मला आश्चर्य वाटत नाही. कारण या गोष्टी माझ्यासाठी नवीन नाहीत. मी लहानपणापासूनच असं आयुष्य जगत आलो आहे. त्यामुळे मी सहन करू शकेन असं मी समजून जातो”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लहानपणी चहा विकला आहे, हे अनेकांना माहितच आहे. परंतु, त्यांनी या मुलाखतीत आपण चहाचे कप धुतले असल्याचीही माहिती दिली. ते म्हणाले की, “मी कप-प्लेट धुवायचो तेव्हा मला माझा दुकानवाला माझ्या कामावरून ओरडायचा. जर थंड चहा दिला तर कानाखाली मारायचा. लहानपणी मी हे सर्व सहन केलं आहे. त्यामुळे आता माझी कोणतीच तक्रार नसते”, अशी करुण कहाणीही त्यांनी सांगितली.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला. संविधानाच्या भावनेचा सन्मान केला पाहिजे. कारण, ज्यावेळी संविधान बनवले गेले तेव्हा सहमतीने ठरवलं गेलं की धर्माच्या आधारावर आरक्षण दिलं नाही पाहिजे. परंतु, आज काँग्रेस धर्माच्या आधारावर आरक्षण देऊ पाहत आहे, जो संविधानाचा अपमान ठरेल.
हेही वाचा >> “गांधींना कोणी ओळखत नव्हतं, चित्रपट बनला तेव्हा त्यांना जगभरात ओळख मिळाली”; पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विधान चर्चेत!
महात्मा गांधींबद्दल काय म्हणाले नरेंद्र मोदी?
“महात्मा गांधी एक मोठं व्यक्तिमत्त्व होतं. आपण जगभरात त्यांची ओळख निर्माण करायला हवी होती. ही आपली जबाबदारी होती. मात्र, आपण त्यात अपयशी ठरलो. त्यांना कोणी ओळखत नव्हतं. ज्यावेळी महात्मा गांधींवर पहिल्यांदा चित्रपट बनला तेव्हा जगभरात गांधी कोण आहे? याबाबत कुतूहल निर्माण झालं. त्यांची ओळख निर्माण करण्यासाठी आपण ७५ वर्षात काहीही केलं नाही” अशी प्रतिक्रिया नरेंद्र मोदी यांनी दिली.
“अनेक समस्यांचे समाधान गांधींच्या विचारात”
“जगभरात जर मार्टीन ल्यूथर किंग आणि नेन्सन मंडेला यांना ओळखलं जाते. मात्र, गांधी त्यांच्यापेक्षा कमी नव्हते. मी संपूर्ण जग फिरलो आहे. मात्र, गांधींना किंवा गांधींच्या माध्यमातून भारताला जी ओळख मिळायला हवी होती, ती मिळाली नाही. आज जगभरातील अनेक समस्यांचे समाधान गांधींच्या विचारात आहे. आपण खूप काही गमावलं आहे.” असेही ते म्हणाले.