software engineer woman loses rs 32 crore in digital arrest : बंगळुरू येथील ५७ वर्षीय महिलेची डिजीटल अरेस्टच्या नावाखाली जवळपास ३२ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या महिलेची सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून तब्बल ६ महिन्यांपेक्षा जास्त काळ ही फसवणूक सुरू होती. तिला कायम व्हिडीओच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलेआणि तिच्याकडून १८७ बँक ट्रान्सफर करून घेण्यात आले.
या फसवणुकीची सुरूवात ही सप्टेंबर २०२४ मध्ये झाली, आणि या प्रकरणात आत्ता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक झालेली महिला ही एक सॉफ्टवेअर इंजिनियर असून अनेक महिने फसवणूक झाल्यानंतर आत्ता तिने पोलिसांकडे धाव घेतली आहे.
या महिलेला डीएचएल कंपनीचा एक्झिक्युटिव्ह असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीचा फोन आला होता. त्या व्यक्तीने आरोप केला की, तिच्या नावावर असलेल्या एका पार्सलमध्ये तीन क्रेडिट कार्ड्स, चार पासपोर्ट आणि बंदी असलेले एमडीएमए नावाचे ड्रग्ज सापडले आहेत आणि ते पार्सल मुंबईतील कंपनीच्या अंधेरी केंद्रावर आले आहे.
जेव्हा महिलेने आपला पॅकेजशी काहीही संबंध नाही आणि ती बंगळुरू येथे राहते असे सांगितले तेव्हा फोन करणाऱ्या व्यक्तीने पार्सलशी फोन नंबर जोडलेला असल्याचे सांगितले आणि हे सायबर गुन्ह्याचे प्रकरण असू शकते असेही सांगितले. त्यानंतर फोन कॉल सीबीआयचा अधिकारी असल्याचा दावा करणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीकडे ट्रान्सफर करण्यात आला, आणि त्याने सर्व पुरवे हे तुमच्या विरोधात आहेत, असे त्या महिलेला सांगितले
फसवणूक करणाऱ्यांनी कथितपणे तिला पोलिसांशी संपर्क साधू नका असे बजावून सांगितले, कारण गुन्हेगार तिच्या घरावर पाळत ठेवून आहेत, असेही त्यांनी सांगितले. कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी आणि मुलाच्या लग्नामुळे घाबरून महिलेने त्यांच्या सूचनांचे पालन केले.
महिलेला दोन स्काइप आयडी इंस्टॉल करण्यास सांगण्यात आले आणि तिला हा प्लॅटफॉर्म या वर्षी मे मध्ये कायमचा बंद पडेपर्यंत कायम व्हिडीओ कॉलवर राहण्यास सांगितले. एका व्यक्तीने स्वतःची ओळख मोहित हांडा सांगितली ज्याने महिलेवर दोन दिवस लक्ष ठेवले, त्यानंतर राहुल यादव नावाच्या व्यक्तीने एक आठवडा लक्ष ठेवले. तिसरा एक प्रदीप सिंह म्हणून व्यक्ती जो स्वतःला वरिष्ठ सीबीआय अधिकारी असल्याचे सांगत होता त्याने महिलेला ती निर्दोष असल्याचे सिद्ध करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला.
गेल्या वर्षी २४ सप्टेंबर आणि २२ ऑक्टोबर या दरम्यान महिलेने तिच्या आर्थिक व्यवहारांची माहिती उघड केली आणि मोठ्या प्रमाणात पैसै पाठवणे सुरू केले. २४ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या काळात तिने श्युरिटी अमाउंट म्हणून दोन कोटी रुपये पाठवले, त्यानंतर कर म्हणून आणखी पेमेंट केले.
फसवणूक करणाऱ्यांच्या सूचनांचे पालन करत पीडितेने तिचे फिक्स्ड डिपॉझिट मोडले, इतर बचत मिळून १८७ व्यवहारांमध्ये ३१.८३ कोटी रुपये हस्तांतरित केले. फेब्रुवारी २०२५ पर्यंत व्हेरिफिकेशन झाल्यानंतर पैसे परत केले जातील, असे त्या महिलेला वारंवार आश्वासन देण्यात आले. फसवणूक करणाऱ्यांनी या महिलेला तिच्या मुलाच्या डिसेंबरमध्ये होणार असलेल्या साखरपुड्यापूर्वी क्लिअरन्स लेटर देण्याचे वचन दिले आणि तिला बनावट कागदपत्र देखील पाठवले.
दरम्यान तणाव आणि सतत देखरेखीखाली राहिल्याने महिलेची मानसिक आणि शरीरिक स्थिती बिघडली असून तिला अनेक महिने वैद्यकीय उपचार घेण्याची आवश्यकता आहे.
या संपूर्ण काळ मला मी कुठे होते आणि काय करत होते याचा स्काइपवर रिपोर्ट द्यावा लागत होता. प्रदीप सिंह हा दररोज संपर्कात होता. मला सांगण्यात आले होते की प्रक्रिया पूर्म झाली की पैसै फेब्रुवारी २०२५ पर्यंत परत मिळतील, असे त्या महिलेने पीटीआयशी बोलताना सांगितले.
डिसेंबरनंतर, फसवणूक करणारे सतत ‘प्रोसेसिंग चार्जेस’ मागत राहिले आणि पैसे परत करण्याची वेळ फेब्रुवारीवरून मार्चपर्यंत पुढे ढकलली. काही दिवसांनंतर अचानक त्यांचा संपर्क तुटला.
महिलेने तिच्या मुलाचे जुनमध्ये लग्न होईपर्यंत वाट पाहिली आणि त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल केली.
एकूण १८७ व्यवहारांच्या माध्यमातून सुमारे ३१.८३ कोटी रुपये लुबाडण्यात आले असे महिलेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे. तिने अधिकाऱ्यांना या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची विनंती केली आहे. पोलिसांनी या फसवणुकीच्या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
