केरळमधील सौरऊर्जा घोटाळ्यातील मुख्य आरोपी सरिता नायर हिने मुख्यमंत्री उम्मन चंडी यांच्यावर लाच स्वीकारल्याचा आरोप केल्याने या प्रकरणाला बुधवारी वेगळेच वळण लाभले. चंडी आणि मंत्रिमंडळातील मंत्री आर्यदन मोहम्मद यांच्यावर लाच स्वीकारल्याचाआरोप करण्यात आला, मात्र दोघांनीही त्याचे जोरदार खंडन केले.
कोचीतील या घोटाळ्याची चौकशी न्या. शिवराजन आयोग करीत असून त्यासमोर बुधवारी सरिता हिने हजेरी लावली. राज्यात महासौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी चंडी यांच्या मुख्य सहकाऱ्याकडे १.९० कोटी रुपये देण्यात आल्याचा आरोप सरिता हिने केला.
त्याचप्रमाणे ऊर्जामंत्री आर्यदन मोहम्मद यांच्या खासगी सचिवाला आपण ४० लाख रुपयांची लाच दिल्याचे सरिता हिने सांगितले.
या प्रकरणातून बाहेर पडण्यासाठी सरिता यांनी सुरू केलेला हा प्रयत्न असल्याचे चंडी यांनी म्हटले आहे. आम्हाला लाच दिल्यानंतर सरिता हिला कोणता लाभ मिळाला ते तिने जाहीर करावे, असे चंडी यांनी थिरुवनंतपूरम येथे वार्ताहरांना सांगितले.