कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. आगामी निवडणुकीच्या तोंडावर विविध राजकीय पक्ष मैदानात उतरले आहेत. सत्ताधारी भारतीय जनता पार्टीसह काँग्रेस आणि जेडीएस पक्षाकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या कर्नाटक दौऱ्यावर गेले आहेत.

आज कर्नाटकमधील बेळगाव येथील जाहीर सभेतून पंतप्रधान मोदी यांनी जोरदार टीकास्त्र सोडलं. काँग्रेसचे लोक प्रचंड निराश झाले आहेत. जोपर्यंत मोदी जिवंत आहे, तोपर्यंत आपली डाळ शिजणार नाही, असं काँग्रेसच्या लोकांना वाटत आहे. त्यामुळे ‘मोदी मरून जा, मोदी मरून जा’ अशा घोषणा ते देत आहेत, अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर टीका केली आहे.

बेळगाव येथील जाहीर सभेत नरेंद्र मोदी म्हणाले, “काँग्रेससारख्या राजकीय पार्टीपासून कर्नाटकमधील लोकांनी सतर्क राहायला हवं. काँग्रेसची लोक प्रचंड निराश झाले आहेत. जोपर्यंत मोदी जिवंत आहे, तोपर्यंत त्यांची डाळ शिजणार नाही, असा विचार ते करत आहेत. त्यामुळे आजकाल सगळेजण ‘मोदी मरून जा, मोदी मरून जा’ अशा घोषणा देत आहेत. काही लोक माझी कबर खोदण्यात व्यग्र झाले आहेत. ‘मोदी तुझी कबर खोदली जाईल,’ असं ते म्हणत आहेत. पण ‘मोदी तुझं कमळ फुलेल’ असं देश म्हणत आहे.”