पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फक्त श्रेय घेणं ठाऊक आहे काम करणं नाही असा टोला काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी लगावला आहे. इंदिरा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधत एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात त्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं कौतुक केलं. जगभरात मनमोहन सिंग यांची ओळख ही त्यांच्या कामामुळे झाली. काही लोक काम करतात आणि मोठे होतात आणि काही लोक फक्त श्रेय घेतात असा टोला आपल्या भाषणात सोनिया गांधी यांनी लगावला.

मनमोहन सिंग यांनी देशाचं पंतप्रधानपद दहा वर्षे सांभाळलं. मात्र त्यांनी कधीही स्वतःचा प्रचार केला नाही. तसेच कोणत्याही कामाचे श्रेय त्यांनी घेतले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव घेतलं नाही मात्र त्यांच्या टीकेचा रोख हा मोदींकडेच होता हे त्यांच्या भाषणातून स्पष्ट जाणवले.

मनमोहन सिंग यांनी इंदिरा गांधींसोबत सुमारे पंधरा वर्षे काम केले. मात्र मनमोहन सिंग हे आत्मस्तुती करणारे नेते नाहीत. दहा वर्षे त्यांनी भारताचे पंतप्रधान पद सांभाळले. आपल्या कामामुळे जगभरातून सन्मान मिळवला. आपल्या कामाचा जगापुढे आदर्श ठेवला असेही सोनिया गांधी यांनी म्हटले आहे. त्यांनी जेव्हा देशाचे पंतप्रधानपद स्वीकारले आणि त्यानंतर ज्या धोरणांचा अवलंब केला त्यामुळे देशाची आर्थिक प्रगती झाली असेही सोनिया गांधींनी आपल्या भाषणात स्पष्ट केले.

छत्तीसगढमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला होता. पाच वर्षांसाठी गांधी घराणे वगळून पक्षाचा अध्यक्ष करून दाखवा असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले होते. या टीकेला उत्तर देताना सोनिया गांधी यांनी मनमोहन सिंग यांची स्तुती करत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.