पंतप्रधान किंवा लडाखी, कोणी तरी खोटं बोलतंय – राहुल गांधी

लडाखमधील लोकांचा व्हिडिओ पोस्ट करत मोदींवर साधला निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेसचे नेते राहुल गांधी. (संग्रहित छायाचित्र)

भारत आणि चीन सीमेवर लडाखच्या पूर्वेकडील गलवान खोऱ्यामध्ये १५ जून रोजी झालेल्या हिंसेमध्ये भारताचे २० जवान शहीद झाले. या घटनेच्या काही दिवसांनंतरच कोणीही आपली एक इंचही जमीन बळकावू शकणार नाही अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांनी लडाखमध्ये चीनने घुसखोरी केलेली नाही असं सांगितलं. मात्र यावरुन आता काँग्रेसने पुन्हा एकदा पंतप्रदानांच्या दाव्यावर हल्लाबोल केला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विटवरुन ‘लडाख स्पीक्स’ नावाने एक तीन मिनिटांचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये लडाखमधील अनेक स्थानिक नागरिक चीनने लडाखमधील जमीन ताब्यात घेतल्याचा दावा करताना दिसत आहेत.

राहुल गांधी यांनी ट्विटवरुन लडाखमधील स्थानिकांनी चीन येथील जमीनीवर ताबा मिळवत असल्याचा दावा करणारा व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना राहुल यांनी, “लडाखमधील लोकं म्हणतायत चीनने आमची जमीन घेतली. पंतप्रधान म्हणतायत आपली जमीन कोणीच घेतली नाही. अर्थातच यापैकी कोणीतरी खोटं बोलत आहे,” अशी कॅप्शन दिली आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये

या व्हिडिओमध्ये लडाखमधील अनेक स्थानिक चीन कशाप्रकारे येथील जमीनीवर ताबा मिळवत आहे हे सांगताना दिसत आहे. काही जणांनी चीनी सैन्य पाहिल्याचं सांगितलं आहे तर काहींनी येथील परिस्थिती बातम्यांपेक्षा अगदीच वेगळी असल्याचं म्हटलं आहे. अनेकांनी लडाखला वाचवण्याची गरज असल्याचेही या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.

प्रसारमाध्यमांवरही टीका

या व्हिडिओमधील काहीजणांनी थेट प्रसारमाध्यमांवर टीका केली आहे. हजारो किलोमीटर दूर बसून प्रसारमाध्यमे देशाचा दिशाभूल करत आहेत असं एकाने म्हटलं आहे. तर दुसऱ्या एका व्यक्तीने बातम्यांमध्ये दाखवली जाणारी परिस्थिती चूकीची असल्याचे सांगितले आहे.

भारत चीन सीमेवर पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यामध्ये १५ जून रोजी झालेल्या हिसेंमध्ये २० भारतीय जवान शहीद झाले. या घटनेनंतर देशभरामधून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर देशातील राजकारणही चांगलेच तापले आहे. विरोधीपक्षांनी सरकारकडून लडाखमधील संघर्षासंदर्भात माहिती लपवली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तर सरकारने हे आरोप फेटाळून लावत भारताची एक इंच जमीनही कोणाला देण्यात आलेली नाही असं सांगत आहे. मागील दोन आठवड्यांपासून या प्रश्नावरुन देशातील प्रमुख विरोधीपक्ष असणाऱ्या काँग्रेसमध्ये आणि भाजपामध्ये शाब्दिक वाद सुरु आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Someone is lying rahul gandhi hits out pm modi with video of ladakhi people claiming china taken indian land scsg

Next Story
पेट्रोल, डिझेल, एलपीजी दरात पुढील आठवडय़ात वाढ?
ताज्या बातम्या