Sonam Raghuvanshi : इंदूरच्या सोनम आणि राजा रघुवंशीची बातमी देशभरात चर्चेत आहे. ११ मे रोजी राजा आणि सोनमचं लग्न झालं. त्यानंतर २० मे रोजी हे दोघं मधुचंद्रासाठी गेले. सुरुवातीला बंगळुरुला हे दोघंही गेले होते. त्यानंतर गुवाहाटीला जाऊन सोनम आणि राजाने कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. २३ मे पासून हे दोघंही बेपत्ता झाले. मात्र २ जून रोजी राजाचा मृतदेह सापडला. तरीही सोनम बेपत्ता होती. ८ जूनच्या रात्री उशिरा ती पोलिसांना शरण आली. आता तिने हत्येची कबुली दिल्याचं मेघालय पोलिसांनी माहिती दिली. सोनम रघुवंशीकडे प्लान बी तयार होता असंही समजलं आहे.
सोनम रघुवंशीचा प्लान बी काय?
सोनम रघुवंशीकडे राजाच्या हत्येचा प्लान बी तयार होता. “आनंद, विशाल आणि आकाश या तिघांना जमलं नाही तर मी राजाला खाली ढकलून देईन. फोटो काढण्याच्या निमित्ताने त्याला खाली ढकलेन.” असं सोनमने तिचा बॉयफ्रेंड राज कुशवाहाला सांगितलं होतं अशी माहिती आता समोर आली आहे. पोलीस सूत्रांनी ही माहिती दिली आहे.
सोनमने काय सांगितलं?
सोनम आणि राजाच्या लग्नाला आज एक महिना पूर्ण झाला. पण राजा या जगात नाही. सोनमने राजाच्या हत्येत आपला सहभाग असल्याचं मान्य केलं आहे. मेघालय पोलिसांनी हा दावा केला आहे. मेघालय पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोनम आणि राज कुशवाहा (सोनमचा बॉयफ्रेंड) या दोघांना समोरासमोर बसवून त्यांची चौकशी करण्यात आली. सोनम आणि राजा यांचे एकत्र फोटोही पोलिसांनी दाखवले. यावेळी सोनम रडू लागली आणि तिने हत्येत आपला सहभाग असल्याचं मान्य केलं असं पोलिसांनी म्हटलं आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.
राज कुशवाहाला ५० हजार रुपये सोनमने दिले होते
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोनमने राज कुशवाहाला ५० हजार रुपये दिले होते. त्या पैशांतून राज कुशवाहा आणि इतर तीन मारेकरी हे शिलाँगला आहे. आरोपींनी दिल्लीहून १७ आणि १८ मे या दिवशी राजधानी एक्स्प्रेसमध्ये प्रवास केला आणि ते गुवाहाटीला पोहचले. त्यानंतर २३ मे च्या दिवशी राजाची हत्या करण्यात आली. त्यानंतर सोनमने राजाच्या सोशल मीडियावर सात जन्मो का साथ अशी पोस्ट केली आणि राजा रघुवंशी जिवंत आहे असं भासवलं. त्यानंतर शिलाँगहून गुवाहाटीला गाडीने गेली आणि तिथून ट्रेनने इंदूरला परतली अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे.
१८ मे रोजी रचला राजाच्या हत्येचा कट
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोनम रघुवंशीने लग्नानंतर सात दिवसांनी म्हणजेच १८ मे रोजी राजाच्या हत्येचा कट रचला होता. तिचा बॉयफ्रेंड राजा कुशवाहा याच्याशी ती सातत्याने संपर्कात होती. लग्नानंतर चार दिवसांनी म्हणजेच १५ मे च्या दिवशी ती तिच्या माहेरी आली होती. तिने त्यावेळी राज कुशवाहाशी संपर्क केला होता. आम्ही आधी बंगळुरु आणि त्यानंतर गुवाहाटीला जाऊ असं तिने राज कुशवाहाला सांगितलं होतं अशीही माहिती आता समोर आली आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे. एवढंच नाही तर सोनमला राजा रघुवंशीशी लग्नानंतर येणारे शरीर संबंध पुढे ढकलायचे होते. त्यामुळे तिने १५ मे रोजी माहेरी येऊन पुढचा कट आखला आणि काय करणार आहोत हे राज कुशवाहा (सोनमचा कथित बॉयफ्रेंड) याला सांगितलं. मेघालय या ठिकाणी हे दोघं २२ मे रोजी गेले होते. त्यानंतर २३ मे रोजी त्यांनी त्यांचं होम स्टे सोडलं होतं.