लोकसभा निवडणुकीत उमेदवार निवडीसाठी अमेरिकेच्या धर्तीवर काँग्रेसमध्ये ‘प्राथमिक’ मतदारसंघांची संकल्पना राबविण्याच्या लेक राहुल गांधी यांच्या निर्णयामुळे आई सोनिया अस्वस्थ झाल्या आहेत. ऐन निवडणुकीच्या धामधूमीत ३० जानेवारीला राहुल गांधी यांनी देशभरातील १४  ‘प्राथमिक’ मतदारसंघ निवडले होते. वर्षभरापूर्वी ‘प्राथमिक’ मतदारसंघ ही संकल्पना राबवणे फायद्याचे ठरले असते, असे मत सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याशी बोलताना व्यक्त केले आहे. ‘आता त्याने (राहुल) निर्णय घेतलाच आहे; तर तो स्वीकारा’, अशी अस्वस्थ भावना सोनिया गांधी यांनी व्यक्त केली आहे.
राहुल यांनी निवडलेल्या प्राथमिक लोकसभा मतदारसंघातून स्थानिक पदाधिकारी मतदानाद्वारे उमेदवार निवडतील. ही प्रक्रिया अत्यंत वेळखाऊ व स्थानिक मतभेद वाढविणारी आहे. त्यात महाराष्ट्रातील दोन्ही ‘प्राथमिक’ मतदारसंघ बदलण्यात आले आहेत. स्वत: किंवा मुलाला उमेदवारी देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी प्रदेशाध्यक्ष मोहन प्रकाश यांच्याकरवी यवतमाळचा प्रायमरी मतदारसंघात समावेश केला होता. मात्र मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘वजन’ वापरून तो बदलला. मराठवाडय़ात प्रारंभी औरंगाबाद प्राथमिक मतदारसंघ होता. त्याऐवजी लातूरची निवड करण्यात आली. विशेष म्हणजे लातूरचे विद्यमान खासदार जयवंत आवळे यांनी जाहीरपणे आपली उमेदवारी मागे घेतली होती. प्रत्यक्षात काँग्रेस नेत्यांनीच त्यांना तशी सूचना केली होती.
स्थानिक उमेदवाराला संधी मिळण्यासाठी लातूरचा समावेश ‘प्राथमिक’ मध्ये करण्यात आल्याचे स्पष्टीकरण काँग्रेस नेते देत आहेत. प्रत्यक्षात मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांच्या अंतर्गत मतभेदांमुळे लातूरचा ‘प्राथमिक’मध्ये समावेश करण्यात आला. चौदा प्राथमिक मतदारसंघांपैकी केवळ लातूरच आरक्षित मतदारसंघ आहे हे विशेष. प्रायमरी मतदारसंघ राहुल गांधी यांची कल्पना असल्याने अन्य एकही नेता त्याविषयी बोलत नाही.