Soundarya Balasubramani : भारतीय लेखिका सौंदर्या बालसुब्रमणी (Soundarya Balasubramani) यांना लंडन या ठिकाणी मारहाण करण्यात आली आहे. त्यांचं नाक फ्रॅक्चर झालं आहे. तसंच त्यांनी एक डोळा जवळपास गमावला आहे. लंडन येथील रस्त्यावर त्यांना अमानुष मारहाण करण्यात आली. या घटनेचा अनुभव त्यांनी सांगितला आहे.

सौंदर्या बालसुब्रमणी काय म्हणाल्या?

” १८ सप्टेंबरच्या दुपारी मी लंडन येथील रस्त्यावरुन चालले होते. तेवढ्यात एक धिप्पाड माणूस तिथे आला. तो मला म्हणाला तुम्ही मला काही पैसे देऊ शकता का? मी त्याला नकार दिला, तेव्हा त्याने माझ्या चेहऱ्यावर ठोसे मारले. माझं नाक त्याचवेळी फ्रॅक्चर झालं आणि रक्त वाहू लागलं. काही सेकंदांसाठी मला काय घडलं ते कळलंच नाही. मी जेव्हा स्वतःकडे पाहिलं तेव्हा माझा शर्ट रक्ताने माखला होता. तसंच रस्त्यावरही रक्त सांडलं होतं. माझ्या नाकातून रक्त वाहात होतं. मी इतक्या मोठ्या प्रमाणावर रक्त याआधी कधीही पाहिलेलं नाही.” असं सौंदर्या बालसुब्रमणी म्हणाल्या.

हल्लेखोर माझ्यामागेच हसत उभा होता

पुढे सौंदर्या ( Soundarya Balasubramani ) म्हणाल्या, “मी तातडीने गुडघ्यांवर बसले कारण मला वाटत होतं की मला चक्कर येईल. मी कसंबसं मागे वळून पाहिलं तर ज्या माणसाने मला ठोसा मारला तो तिथे उभा होता आणि हसत होता. मात्र हा सगळा प्रकार घडल्यानंतर लोकांनी गर्दी केली. त्यानंतर पोलीसही आले. मला रुग्णालयात नेण्यात आलं. मी डॉक्टरांना आठ तासांनी पाहिलं.”

डोळ्यांची काळजी वाटत होती

सौंदर्या ( Soundarya Balasubramani ) पुढे त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाल्या, “उपचार सुरु असताना माझ्या मनात एकच विचार होता की डोळ्याला इजा झाली आहे पण डोळा गमावला तर? मी डोळ्यांबाबत फार चिंता करत होते. डॉक्टरांनी मला सांगितलं तुम्ही ज्या डोळ्याला इजा झाली आहे तो सध्या उघडू शकत नाही. सिटी स्कॅन करुन मला डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्या नाकात फ्रॅक्चर्स आहेत पण तुमचे डोळे ठीक आहेत. माझे डोळे ठीक आहेत म्हटल्यावर मी सुटकेचा निश्वास सोडला आणि त्या क्षणी भारतात परतण्याचा निर्णय घेतला.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हल्लेखोराला अटक झाली आहे

दुसऱ्या एका पोस्टमध्ये सौंदर्या बालसुब्रमणी ( Soundarya Balasubramani ) म्हणाल्या माझ्यावर जेव्हा हल्ला झाला त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच १९ सप्टेंबरला पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली. माझ्याआधी त्याने आणखी दोघांवर असाच हल्ला केला होता. त्याला अटक करण्यात आली आहे आणि न्यायालय त्याला शिक्षाही सुनावेल अशी आशा आहे. मी तो प्रसंग मात्र विसरु शकत नाही. कशीबशी त्यातून सावरण्याचा प्रयत्न करते आहे. मागच्या आठवड्यात काय घडलं हा विचार केला तरी अंगावर काटा येतो. असाही अनुभव सौंदर्या यांनी सांगितला आहे.