नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा शिरच्छेद करणाऱ्याला योग्य इनाम दिले जाईल, अशी वादग्रस्त घोषणा समाजवादी पक्षाच्या नेत्याकडून करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजप आणि समाजवादी पक्षातील संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाच्या बागपत येथील युवक संघटनेचा माजी अध्यक्ष तरूण देव यादव याने ही वादग्रस्त घोषणा करून खळबळ उडवून दिली आहे. नोटाबंदीचा निर्णय घेऊन देशात आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण केल्याबद्दल व गोध्रा दंगलीसाठी जबाबदार असल्याचे सांगत तरूण यादव याने नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा शिरच्छेद करणाऱ्याला यथोचित बक्षिस दिले जाईल, असे तरूण यादवने म्हटले आहे.
समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शिवपाल यादव यांनी या महिन्याच्या सुरूवातीलाच उत्तर प्रदेशमध्ये पक्षाच्या जिल्हा स्तरावरील सर्व संघटना बरखास्त केल्या होत्या. मात्र, तरीही तरूण देव यादव याने ही घोषणा करण्यासाठी लिहलेल्या पत्रात स्वत:चा उल्लेख सपाच्या युवजन सभेचा अध्यक्ष म्हणून केला आहे. याशिवाय, सोशल मिडीयावर तरूणचा एक व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये तरूण नरेंद्र मोदी व अमित शहा यांना बागपत येथे सभा घेऊन दाखवाच, असे आव्हान देताना दिसत आहे. यामध्ये तरूणने मोदी आणि शहांच्या शिरच्छेदासाठी इनाम देण्याच्या घोषणेचा उल्लेख असणारे पत्रही वाचवून दाखवले आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे सामान्य माणूस होरपळत आहे, मजुरांना त्यांचे वेतन मिळत नाही. तुम्ही तुमच्या आजोबांच्या वयाच्या व्यक्तीला तासनतास बँकेच्या रांगेत उभे राहिलेले पाहिले, तर तुम्हीदेखील मोदींना शाप द्याल. ही एकप्रकारची आणीबाणी नाही का?, हे सरकार सत्तेवरून गेलेच पाहिजे. त्यामुळे जो कोणी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा शिरच्छेद करेल, त्याला मी योग्य इनाम देईन, असे तरूण यादवने म्हटले आहे. दरम्यान, याविषयी समाजवादी पक्षाशी संपर्क साधला असता त्यांनी तरूणच्या विधानाशी असहमती दर्शवत त्याच्याविरूद्ध कारवाई करण्याचे संकेत दिले. मात्र, आगामी काळात या विधानामुळे भाजप आणि समाजवादी पक्ष या दोन्ही पक्षांतील संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे आहेत.