दोन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला भगवा रंग देण्यात आला होता. या कृतीवर समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान यांनी आपल्या शैलीत टीका केली आहे. रंग तर आपल्या हाताचा आहे. ज्यामध्ये रंग भरायचे आहेत ते भरा. भगवा रंग तर अल्लाचा रंग आहे, असे उपहासात्मक शैलीत त्यांनी म्हटले. त्याचबरोबर उन्नाव बलात्कार प्रकरणातील भाजपा आमदार कुलदीपसिंह सेंगर यांना अटक न केल्याबद्दल आणि स्वामी चिन्मयानंद यांच्यावरील बलात्काराचा गुन्हा मागे घेण्याच्या योगी सरकारच्या निर्णयाचा समाचार घेतला. यांचेच गुन्हे मागे का घेता, सर्वच बलात्काऱ्यांवरील खटले मागे घ्या, असा खोचक सल्ला त्यांनी दिला. पोलीस, न्यायालयांची गरजच काय आहे..भाजपा तर सर्वांना बरोबर घेऊन जात आहे. सर्व गुन्हेगारांचे मत घ्या, सर्वांना निवडणुकीत उभे करा, न्यायालयांची दरवाजे बंद करा आणि तुरूंगाचे दरवाजे खुले करा, असे ते म्हणाले.
ते म्हणाले, जर ३०२ चे गुन्हे, लूट, जाळपोळ, दंगल भडकवणे आणि पोलिसांना मारणाऱ्यांवरील गुन्हे मागे घेतले जाऊ शकतात. तर यावर कोणाच आक्षेप नसला पाहिजे. आता साक्षी महाराजांवरील खटला कधी मागे घेणार याची वाट पाहावी लागणार. मी तर म्हणतो की, फक्त चिन्मयानंद यांचाच खटला मागे का ? साक्षी महाराजांवर हा मोठा अन्याय आहे. पहिल्यांदा साक्षी महाराजांवरील खटला मागे घ्यावा मग चिन्मयानंद यांच्यावरील गुन्हा मागे घ्यावा. त्याचबरोबर देशात जितके बलात्कारी आहेत, त्या सर्वांवरील गुन्हे मागे घेतले पाहिजेत.
उत्तर प्रदेशमधील बदायूं जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला भगवा रंग देण्यात आला होता. मोठ्या टीकेला सामोरे जावे लागल्यानंतर आता पुन्हा एकदा या पुतळ्याला निळा रंग देऊन वाद शमवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. बदायूंमधील बसपाचे नेते हेमेंद्र गौतम यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुन्हा एकदा निळा रंग दिला आहे.